

काटेवाडी: बारामती तालुक्यातील 216 अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत. त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्याबरोबरच सुरक्षित व आनंददायी शिक्षण मिळणार आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्य शासनाने अंगणवाड्यांचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी किट देण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील 216 अंगणवाड्यांना हे किट मिळाले असल्याने या अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत.
सक्षम अंगणवाडी योजनेमुळे बारामती तालुक्यातील प्रत्येक अंगणवाडीत मुलांचे शिक्षण, आरोग्य, व पोषण आहार, स्वच्छतेसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी लागणारे आधुनिक साहित्य पुरवले जाणार आहे. आधुनिकीकरणामुळे अंगणवाड्या केवळ मुलांसाठीच नव्हे, तर महिलांच्या सक्षमीकरणासाठीही एक महत्त्वाचे केंद्र होणार आहे. अंगणवाड्यांना भौतिकदृष्ट्या अद्ययावत केल्याने शैक्षणिक वातावरणनिर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकास, विविध उपक्रमांद्वारे महिला बालके, किशोरींना विविध सेवा देणे शक्य होणार आहे.
स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये शिक्षण आणि खेळ यांचा समन्वय साधणारी आधुनिक साधनसामग््राी, स्मार्ट स्क्रीन, डिजिटल लर्निंग टूल्स, बाल आरोग्य तपासणी उपकरणे, पोपणविषयक चाट्र्स तसेच बालविकास कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण मार्गदर्शिकेचा समावेश असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान माने यांनी दिली.
बारामती तालुक्यात 385 अंगणवाड्या आहेत. त्यांपैकी 216 अंगणवाड्यांना स्मार्ट साहित्यपुरवठा केला जाणार आहे. या अंगणवाड्यांना 43 इंची एलईडी टीव्ही, आरओ युनिट, पोषण वाटिकेमध्ये फावडे, खुरपे, टिकाव, घमेले, पाणी कॅन, रेन वॉटरहार्वेस्टिंग यासह अन्य साहित्य मिळणार आहे. स्मार्ट अंगणवाडी योजना ही बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदृष्टीचे पाऊल ठरणार आहे. दरम्यान, तालुक्यात 14 अंगणवाडी इमारतींचे बाधकाम सुरू आहे व जवळपास 32 अंगणवाड्यांना स्वःतची इमारत नसल्याचे आढळले आहे.
स्मार्ट अंगणवाडी योजना ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक अंगणवाडीत अत्याधुनिक साहित्य, शिक्षणसाधने, आरोग्यविषयक उपकरणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
किशोर माने, गटविकास अधिकारी