

उरुळी कांचन: दशक्रिया विधीसाठी निघालेल्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खोलशेत वस्ती परिसरात ही घटना मंगळवारी (दि. ९) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अंजना वाल्मिक कोतवाल असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजना कोतवाल या अष्टापूरातील खोलशेत वस्ती येथून खानापूर येथे दशक्रिया विधीला जाण्यासाठी राहत्या घरापासून सुरेश कोतवाल यांच्या घराकडे निघाले होत्या. पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निघाल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोतवाल यांच्यावर हल्ला केला.
या हल्यात बिबट्याचा जोरदार पंजा त्यांच्या डोक्याला तसेच पायावर लागला. त्यामुळे त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. वेदनेने हालचालही कठीण झालेल्या कोतवाल यांनी मोठ्याने ओरडल्या. यामुळे बिबट्या पळून गेला. नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला कोतवाल यांची मान सापडली नाही. कोतवाल यांच्यावर तातडीने वाघोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, वन विभागाने लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी अष्टापुरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, उपसरपंच संजय कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव कोतवाल, माजी संचालक श्रीहरी कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, दत्तात्रेय कटके, राजेश कोतवाल समस्त ग्रामस्थ अष्टापूर यांनी केली आहे.