

वेल्हे : बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे सिंहगड, पानशेत भागातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मोसे बुद्रुक येथील जनाबाई ढेबे यांची शेळी शनिवारी (दि. ६) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. पानशेतचे वनपरिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुने व वनरक्षक स्वप्निल उंबरकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पानशेत रस्त्यावरील ओसाडे येथेही बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या वावरामुळे पशुधन जगवणे कठीण झाले आहे. बिबट्यांनी कुत्री, वासरे, गायी अशा जनावरांचा फडशा पाडला आहे.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून सिंहगड भागातील नागरी वस्त्या, कंपन्या, फार्म हाऊस आदी ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धनराज जोरी यांनी केली आहे.