

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये डिंभे डावा कालव्याला रब्बी हंगामातील आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अतिशय कमी दाबाने डिंभे डावा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे कांदा लागवडीला वेग येणार असून रब्बी हंगामातील अनेक पिकांना जीवदान मिळणार आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमधील पिके घोड शाखेला पाणी नसल्याने होरपळून चालली आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. कालव्याला त्वरित पाणी सोडा; अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा थोरांदळेचे सरपंच जे. डी. टेमगिरे, ऊस उत्पादक संघाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब खालकर, हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर व शेतकऱ्यांनी दिला होता. त्यानंतर हे पाणी सोडण्यात आले आहे.
निवडणुकीच्या काळात नेत्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. एरवी शेती व पाण्याबद्दल बोलणारे सत्ताधारी हे पाणी का सोडले नाही याबाबत बोलत नाही. कालवा समितीची बैठक कधी होणार हे सिंचन अधिकारी सांगत नाहीत. आता कमी दाबाने पाणी सोडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
गणेश गाडे, बजरंग दल तालुकाध्यक्ष, आंबेगाव
कालवा समितीच्या बैठका वेळेवर हव्यात. कालव्याचे काम वेगाने पूर्ण करावे. रब्बी हंगामातील पाण्याची आवर्तने जाहीर करावीत.
बाबासाहेब खालकर, अध्यक्ष, ऊस उत्पादक संघ