

खेड : खेड तालुक्यातील होलेवाडी-निमगाव रस्त्यावर पावसामुळे मोठे खड्डे पडून अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास आणि नुकसानीतून मनस्ताप सहन करावा लागत होता.
आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित विभागाला दोन दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्यास सांगितले होते. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. रविवारी (दि. ७) आमदार काळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या कामाची पाहणी केली.
गेल्या काही महिन्यांपासून होलेवाडी ते निमगाव या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात पाऊस सुरू असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात विलंब झाला. काही ठिकाणी दोन फुटांपेक्षा अधिक खोली असलेले खड्डे बघून चालक हैराण झाले होते. त्यात परिसरातील विविध कार्यक्रमांच्या उपस्थितीसाठी ये-जा करणाऱ्या आमदार बाबाजी काळे यांचाही समावेश होता. आमदार बाबाजी काळे यांच्या माध्यमातून खरपुडीचे सरपंच व बाजार समिती संचालक जयसिंग भोगाडे यांनी स्वखर्चाने तात्पुरती खड्ड्यांची डागडुजी केली होती; मात्र या रस्त्यावर डांबर टाकून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांची होती. आमदार काळे यांनी प्रशासनाला तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान दोन दिवसांत रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे तात्काळ दुरुस्त करण्याची कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार काळे हे एका धार्मिक कार्यक्रमासाठी याच रस्त्याने जात असताना वाहन थांबवून त्यांनी कामाची माहिती घेतली. खरपुडीचे सरपंच तथा खेड बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे, संदीप गाडे, विलास मांजरे, शंकरराव मांजरे, राहुल मलघे व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळ :------
निमगाव खंडोबा रस्त्यावरील खड्डे बुजवले जात असताना या कामाची माहिती घेताना आमदार बाबाजी काळे, जयसिंग भोगाडे व इतर.