Indigo Airline Issue: उड्डाण उशीर, फ्लाइट रद्द, बॅगा गायब! इंडिगोच्या बेजबाबदार सेवेमुळे ताजणे कुटुंबीय हैराण
चऱ्होली : चऱ्होलीतील गणेश ताजणे कुटुंबियांबरोबर शिमला कुलू मनाली या ठिकाणी सहलीसाठी गेले होते. जाताना आणि येताना त्यांनी इंडिगोच्या विमानसेवेचाच लाभ घेतला. मात्र इंडिगोच्या विमानसेवेमुळे लाभ होण्याऐवजी त्यांचे नुकसानच जास्त झाले.
जाताना आणि येताना दोन्ही वेळेला इंडिगोचेच विमान होते. मात्र जाताना विमान एक तास उशिरा उपलब्ध झाले. आणि येताना तीन डिसेंबरच्या रात्री दिल्ली ते पुणे असे कनेक्टिंग विमान रात्री दहा वाजता होते. गणेश ताजणे सहा वाजताच विमानतळावर पोहोचले.
सर्वांनी बोर्डिंग पास बनवले होते. रात्री नऊ वाजता सांगण्यात आले की तुमचे विमान उशिरा येणार आहे. त्यामुळे ताजणे कुटुंबीय विमानाची वाट बघत थांबले. त्यानंतर रात्री एक वाजता विमान रद्द झाले आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर विमान कंपनीने गणेश ताजणे यांना पहाटे पाचचे विमानाचे तिकीट दिले. मात्र ते विमानही प्रत्यक्षात आठ वाजता विमानतळावरून निघाले.
सकाळी दहा वाजता मुंबई विमानतळावर पोचल्यावर देखील एक तास विमानाला पार्किंगमध्येच थांबावे लागले. त्यानंतर ज्यावेळी गणेश ताजणे बॅगा घेण्यासाठी पोहोचले त्यावेळी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सहा पैकी फक्त चारच बॅगा दिल्या आणि दोन बॅगा दिल्ली एअरपोर्टवर राहिल्या असे सांगितले. या बॅगा 24 तासात आपल्या घरी मिळतील असे सांगितले.मात्र आता चार दिवस उलटूनही बॅगा मिळाल्या नाहीत. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचे नंबर देखील बंद आहेत. इंडिगोच्या गलथान व्यवस्थापनामुळे देशातील लाखो लोकांना अशा पद्धतीने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सरकारने इंडिगोच्या व्यवस्थापनाची चौकशी करून देशातील लाखो प्रवाशांचा मनस्ताप कमी करावा आणि प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा. आम्हाला आमच्या बॅगा परत मिळवून द्याव्यात ही अपेक्षा.
गणेश ताजणे, ग्रामस्थ, चऱ्होली बुद्रुक

