

पुणे: पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला वेग आला असून, शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, पारगाव मेमाणे, उदाची वाडी, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील सुमारे 450 एकर जमीन देण्यास शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. सोमवारी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमतीपत्रे, तसेच प्रतिज्ञापत्रे सादर केल्याने मोबदला प्रक्रियेला गती मिळाली आहे.
या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुमारे 3 हजार 200 शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांसाठी आकर्षक मोबदल्याचे पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी समाधान व्यक्त करीत पुढे सरसावले आहेत. पॅकेज निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये संबंधित जमिनीवर कोणताही खटला, बोजा किंवा वाद नसल्याची हमी देण्यात आली आहे. तसेच भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः घेण्याचेही त्यांनी नमूद केले आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर ही प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली असून, प्रशासनाकडून त्यांची सखोल छाननी केली जाणार आहे.
यानंतर जमिनींचे संयुक्त मोजमाप, घरे, झाडे, पाइपलाइन यांचे मूल्यांकन करून मोबदल्याचा परिगणना तक्ता तयार केला जाईल. छाननी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना करारासाठी नोटिसा देण्यात येतील आणि भूसंपादन अधिकाऱ्यांसमवेत संमती करार केला जाईल. अंतिम टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
दरम्यान, सासवड येथील उपविभागीय कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी कार्यालयात संमतीपत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अल्पभूधारक, भूमिहीन व स्थानिक शेतकऱ्यांना मोबदल्यात प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या प्रक्रियेमुळे विमानतळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.