

पुणे: विरोधातील एकाला माहिती देत असल्याच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला सदनिकेत डांबून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाला विवस्त्र करून त्याचे चित्रीकरणही केले. याप्रकरणी चौघांविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वप्नील कांबळे (रा. दत्तवाडी), सिद्धार्थ अनंता भगत (रा. नवी पेठ), सागर चौधरी (रा. कर्वेनगर) आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा २१ वर्षीय तरुण दत्तवाडी परिसरात राहतो. आरोपींचा दत्तवाडीतील एका टेलरशी वाद झाला होता. सुमारे वर्षभरापूर्वी संबंधित टेलर दत्तवाडी सोडून गेला होता. मात्र, फिर्यादी हा त्या टेलरला आरोपींची माहिती पुरवत असल्याचा संशय आरोपी स्वप्नील कांबळे याला होता. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले. याच संशयातून ५ जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपींनी दत्तवाडी परिसरातून फिर्यादीचे अपहरण केले.
त्याला दुचाकीवर बसवून कर्वेनगर येथील एका सदनिकेत नेण्यात आले. तेथे त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. तसेच कपडे उतरविण्यास भाग पाडून त्याचे विवस्त्र अवस्थेतील चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जखमी अवस्थेत तरुणाला दत्तवाडी परिसरात सोडून आरोपी पसार झाले. घरी परतल्यानंतर त्याच्या आईने मारहाणीबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला तो पानशेत येथे फिरायला गेलो असताना दुचाकीस्वारांशी भांडण होऊन मारहाण झाल्याचे सांगत होता. मात्र, आईने वारंवार विचारल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.