

पुणे: आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान चोरी, चेन स्नॅचिंग आणि अन्य अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत आतापर्यंत ८९ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये ६७ महिला आणि २२ पुरुषांचा समावेश असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून चार विशेष 'अँटी चैन स्नॅचिंग' पथके कार्यरत आहेत.
याशिवाय ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत ९ ते ११ जुलैदरम्यान ६७ महिला आणि २२ पुरुष अशा एकूण ८९ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक मोहिते आणि त्यांच्या पथकाकडून या संशयितांची चौकशी सुरू आहे.