

पुणे: होर्डिंग करारातील अनियमिततेप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभागाने आणि महापालिकेने शैक्षणिक संस्था शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेला नोटीस बजावल्या आहेत. या कारवाईमुळे संबंधित प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळीने टिळक रोड येथील एस. पी. कॉलेज परिसरात उभारलेल्या सहा जाहिरात फलकांसाठी सिद्धिविनायक ॲडव्हर्टायझिंग कंपनीसोबत सन २०२१ मध्ये ७२ महिन्यांचा करार केला. मात्र, हा करार नोंदणीकृत करण्याऐवजी केवळ नोटराइज केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांनी केला होता.
याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि पुणे महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. तसेच, नोंदणी व मुद्रांक विभागानेही शासनाची फसवणूक झाल्याबाबत खुलासा मागवत नोटीस जारी केली आहे. त्यात सात दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.