

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या राजकीय चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी फेटाळून लावले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा दावा करीत त्यांनी सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
पत्रकारांशी संवाद साधताना सुळे म्हणाल्या, 'आमची व काँग्रेसची विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. माध्यमांमध्ये किंवा राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही.' त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील अंतर्गत नाराजीबाबत विचारले असता सुळे यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. 'पक्षात कोणीही नाराज नाही आणि कोणी नाराज असेल, तरी तो बाहेर येऊन बोलणार नाही,' असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर पक्षात सर्व काही सुरळीत असल्याचा संदेश देण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस यांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी भूमिका स्पष्ट करीत विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत निर्माण झालेल्या तर्कांना त्यांनी उत्तर दिले.
त्याचा अर्थ विलीनीकरण असा नाही
महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समन्वयाचे राजकारण सुरू असल्याचे मान्य करतानाच त्याचा अर्थ पक्षांचे विलीनीकरण असा होत नसल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. निवडणुकांमध्ये जागा वाटप, प्रचार आणि रणनीतीच्या पातळीवर सहकार्य होऊ शकते; मात्र प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व कायम राहील, असे संकेत त्यांनी दिले. सुळे यांच्या या स्पष्टीकरणामुळे महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात विराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.