

पुणे: दारूच्या नशेत पोलिस गणवेश परिधान करून विनानंबर प्लेटची कार विरुद्ध दिशेने चालवणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यातील मांजरी परिसरात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ नागरिकांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. संबंधित महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ही घटना मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. संबंधित ३९ वर्षीय महिला पोलिस कर्मचारी काळेपडळ पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी कार पाहून इतर वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली. नागरिकांनी कारचालक महिलेला जाब विचारला असता, ती दारूच्या नशेत असल्याचे आणि पोलीस गणवेशात असल्याचे समोर आले.
यावेळी नागरिकांनी या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी रजेवर होत्या. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस त्या कर्तव्यावर उपस्थित नव्हत्या. रजेच्या कालावधीत पोलीस गणवेश परिधान करण्याची परवानगी नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्या बंडगार्डन परिसरात मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करून परतत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची ओळख पटविण्यात आल्याचे सांगितले. संबंधित कारवर नंबरप्लेटही नव्हती. याप्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यासह संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मांजरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक माहितीची मागणी काळेपडळ पोलीस ठाण्याकडे करण्यात आली असून, तिचा जबाबही नोंदविण्यात येणार आहे.