

पुणे: राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी गतवर्ष हंगाम २०२५-२६ मध्ये सर्वाधिक ऊसतोडणी व वाहतूक खर्चाच्या साखर कारखान्यांची यादी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये प्रतिटनास सरासरी १३८५.५४ रुपयांइतकी सर्वाधिक कपात अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील श्री क्रांती शुगर ॲण्ड पॉवर लि., तर बीड तालुक्यातील सावरगावच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याने ८०८.४७ रुपयांइतकी सर्वात कमी कपात केलेली आहे.
यामध्ये सर्वाधिक कपात करणाऱ्या पहिल्या दहामध्ये पाच कारखाने हे ओंकार साखर कारखान्यांचे आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून कमीत कमी ऊसतोडणी व वाहतुकीची रक्कम वजा व्हावी, यासाठी कपातीची माहिती महत्त्वपूर्ण आहे.
राज्यात प्रचलित पद्धतीनुसार साखर कारखान्यांमार्फत ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारणी करुन शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या उसाची तोडणी व वाहतूक केली जाते. त्यापोटी आलेला खर्च हा ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या ढोबळ रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) देय रकमेतून कपात करण्यात येतो.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप हंगाम २०२५-२६ या वर्षाच्या प्रतिमेट्रिक टन ऊसतोडणी व वाहतूक खचाची माहिती व्हावी, यासाठी राज्यातील साखर कारखानानिहाय प्रतिमेट्रिक टन ऊसतोडणी व वाहतूक खर्चाबाबतची माहिती परिपत्रकारद्वारे प्रसिद्ध केली आहे.
सर्वाधिक खर्च कपातीचे १० कारखाने
अहिल्यानगर - श्री क्रांती शुगर ॲण्ड पॉवर लि. १३८५.५४
जालना - श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना १३२२.७२
सोलापूर - ओंकार शुगर कोजनरेशन इंड.-अक्कलकोट (मातोश्री शुगर) १३१९.७९
लातूर - ओंकार साखर कारखाना लि.-निलंगा १२८७.२६
सोलापूर - ओंकार साखर कारखाना लि.माळशिरस- १२५८.५६
सोलापूर - जयहिंद शुगर प्रा.लि.दक्षिण सोलापूर- १२५५.६८
अहिल्यानगर - ओंकार शुगर प्रा.लि.(साजन शुगर)श्रीगोंदा - १२५०.०२
कोल्हापूर - ओंकार शुगर ॲण्ड डिस्टिलरी पॉवर,राधानगरी- १२४९.०१
अहिल्यानगर - गौरी शुगर(श्री साईकृपा शुगर) हिरडगांव- १२४०.५५
सोलापूर - सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी-पंढरपूर १२३८.६९