

पुणे: शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि जलटाक्यांमध्ये तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे गुरुवारी (दि. 23) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून गुरुवार मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार आहे. या कालावधीत नवीन पर्वती (500 एमएलडी) व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव, वारजे, लष्कर, भामा आसखेड, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, तसेच खडकवासला जॅकवेल येथे विद्युत, पंपिंग व स्थापत्य दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा दिवसभर ठप्प राहणार आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शुक्रवार 24 एप्रिल रोजी पाणीपुरवठा सकाळी उशिरा आणि कमी दाबाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन केले आहे.
पर्वती परिसरातील एमएलआर, एचएलआर व एलएलआर टाक्यांसह पेठा, सहकारनगर, बिबवेवाडी, कात्रज, कोंढवा, हडपसर, येरवडा, खराडी, वडगाव शेरी, कोथरूड, औंध, बाणेर, बालेवाडी, वारजे, शिवाजीनगर, स्वारगेट, तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
विशेषतः लष्कर, वारजे, पर्वती, वडगाव आणि भामा आसखेड जलकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या भागांमध्ये पूर्ण दिवस पाणी मिळणार नाही. काही ठिकाणी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही बंद राहणार आहे. तातडीच्या दुरुस्तीमुळे ही पाणीकपात अपरिहार्य असल्याने महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे.