

पुणे: हांडेवाडीतील करिअप्पा कॅम्पस परिसरातील यशोतेज ॲकॅडमीत शिकणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याने 10 नोव्हेंबर 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, पोलिस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून व संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, संचालक व सीईओ विकास पाटील आणि वॉर्डन वसंत सरकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवधूत उल्हास बडे (वय 16, रा. ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने निवासी खोली क्रमांक 513 मध्ये फॅनला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याचे वडील उल्हास बडे यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर रूममेटचे तीन हजार रुपये चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
समुपदेशनाचा अभाव ठरला घातक
अवधूतचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. तो यशोतेज ॲकॅडमीत 11 वीचे शिक्षण घेण्यासोबतच एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. रूममेटचे तीन हजार रुपये हरवल्यानंतर त्याच्यावर संशय घेतला होता. वॉर्डनने त्याला बोलावून ॲकॅडमीतून काढून टाकण्याबाबत सांगितल्याने तो मानसिक तणावाखाली गेला.
महत्त्वाचे म्हणजे, अवधूत अल्पवयीन असतानाही त्याचे योग्य समुपदेशन करण्यात आले नाही, तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती पालकांना वेळेत दिली नाही. या निष्काळजीपणामुळेच तो नैराश्यातून बाहेर पडू शकला नाही आणि अखेरीस त्याने आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर संस्थापक, सीईओ आणि वॉर्डन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शंभूराज जाधव यांनी दिली.