

आशिष देशमुख
पुणे: आपल्या जंगलांच्या झाडांमधील कार्बन शोषण आणि साठवणक्षमताच कमी होत आहे. त्यामुळे कार्बनडाय ऑक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात उत्सर्जित होत आहे.
त्याचा परिणाम म्हणून देशाच्या तापमानात मोठी वाढ तसेच काही भागांत दुष्काळ, तर काही ठिकाणी अतिवृष्टी वाढत आहे, असे संशोधन पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांनी केले आहे. बुधवारी (दि. 22) सर्वत्र जागतिक वसुंधरा दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशाच्या तापमानवाढीबाबत ‘दै. पुढारी’ घेतलेला आढावा.
भारतातील जंगले ही महत्त्वाचे कार्बन सिंक
(कार्बन शोषक ) आहेत. झाडे ही वातावरणातून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि तो खोड, फांद्या, पाने, मुळे यांमध्ये साठवतात. परंतु वाढत्या तापमानाच्या जगात या कार्बन साठवणुकीत कसा बदल होत आहे, यावर पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) च्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. यात ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल नेतृत्वाखालील एका नवीन संशोधन झाले. यात संशोधक फिथा फातिमा, मरिना मॅथ्यू यांचाही सहभाग आहे.
काय आहे अहवालात...?
हवामानबदलामुळे भारतातील जंगलांमधील कार्बन साठवणुकीच्या पद्धतीत कसा बदल होत आहे, यावर या शास्त्रज्ञांनी प्रथमच प्रकाश टाकला आहे. ‘एनव्हायर्नमेंटल रिसर्च : क्लायमेट’ या जागतिक दर्जाच्या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झालेल्या या अभ्यासात जीवाश्म इंधनाच्या कमी, मध्यम आणि उच्च उत्सर्जनाच्या मार्गांनुसार अलीकडच्या काळात, नजीकच्या भविष्यात, शतकाच्या मध्यापर्यंत आणि शतकाच्या अखेरीस जंगलांमधील कार्बनमध्ये कसा बदल होऊ शकतो, याचा शोध घेण्यात आला आहे.
डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी नोंदवलेली निरीक्षणे
भारतातील सजीव वनस्पती जगतामध्ये साठवलेला कार्बन देशातील सर्व प्रमुख वनक्षेत्रांमध्ये वाढण्याचा अंदाज आहे.
ही वाढ समान नसेल यात वाळवंटी आणि निम-शुष्क प्रदेशांमध्ये सर्वाधिक वाढ अपेक्षित आहे.
ट्रान्स-हिमालय, गंगेचे मैदान आणि दख्खन द्वीपकल्पाच्या भागात कार्बंनचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे.
महाराष्ट्रीत पश्चिम घाट, ईशान्य आणि हिमालयीन जंगलांमधील कार्बनच्या प्रमाणात वाढ होते आहे, पण ती माफक प्रमाणात आहे.
या अभ्यासानुसार, भारताच्या वनक्षेत्रांमध्ये सरासरी कार्बन साठा ऐतिहासिक काळात 7.74 किलोग््रॉम प्रतिचौरस मीटरवरून 21 व्या शतकाच्या अखेरीस कमी उत्सर्जनाखाली 10.24, मध्यम उत्सर्जनाखाली 11.76 आणि उच्च उत्सर्जनाखाली 13.67 पर्यंत वाढेल.
हे प्रमाण सन 2100 पर्यंत सुमारे 35 %, 62% आणि 97% वाढीशी जुळते. हे तिन्ही भविष्यकाळ सुमारे 2030 पर्यंत साधारणपणे सारखेच राहतात. त्यानंतर 2050 पर्यंत वेगवेगळ्या उत्सर्जन मार्गांनुसार त्यांच्यात भिन्नता येऊ शकते.