

पुणे: टोळक्याने बॅट आणि लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वानवडी परिसरात बुधवारी (दि. 18) पहाटे घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या संशयातून हा प्रकार घडल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. यातील चौघा संशयितांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. रूपेश धनराज शिंदे (वय 19, रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील धनराज बळीराम शिंदे (वय 45) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रूपेश शिंदे आणि त्याचा मित्र अजय गणेश टिंगरे (वय 20) हे दोघे बुधवारी (दि. 18) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास दुचाकीवरून मोशीच्या दिशेने जात होते. हडपसर येथील शंकरमठ परिसरातून जात असताना ते लघुशंकेसाठी थांबले. त्यानंतर ते जवळच असलेल्या पवार एन्क्लेव्ह सोसायटीसमोर कॅनॉललगतच्या एका मोकळ्या जागेत गेले. त्या ठिकाणी कबुतरे ठेवण्याचे बॉक्स होते. दोघे तिथे गेले असता अचानक कुर्त्यांनी जोरात भुंकायला सुरुवात केली. कुत्र्यांच्या आवाजाने कुणीतरी शिरल्याचा संशय निर्माण झाला आणि तेथील काही रहिवाशांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दुसरीकडे भीतीपोटी रूपेश आणि अजय तिथून सैरावैरा पळू लागले.
पळताना मुख्य रस्त्यावर जिनमाता मोटर्ससमोर रूपेशचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्या वेळी रूपेश या टोळक्याच्या ताब्यात सापडला. पाठलाग करणाऱ्या पाच जणांनी रूपेशला क्रिकेटच्या बॅटने डोक्यात व अंगावर बेदम मारहाण केली. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रूपेशला तत्काळ जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
...कबूतरचोरीचा संशय?
आरोपींनी नेमक्या कोणत्या रागातून ही टोकाची मारहाण केली, याचा उलगडा पोलिस करीत आहेत. कबूतर चोरण्याच्या संशयातून ही घटना घडली का? या दिशेने देखील पोलिस कसून तपास करीत आहेत.
मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यानंतर या घटनेमागील नेमके कारण समजू शकेल.
राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ 5