

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने दमदाटी करून आपल्या रूममधून तीन विद्यार्थिनींना मंगळवारी रात्री उशिरा रूमबाहेर काढल्याची घटना समोर आली. या प्रकारामुळे वसतिगृहातील प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर आला आहे.
विद्यापीठात विविध अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांनी एका रूममध्ये राहण्यास सांगितले. त्यानुसार संबंधित विद्यार्थिनी रूममध्ये राहण्यास गेल्या. परंतु, पूर्वीपासून रूममध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने याबाबत आक्षेप घेतला आणि मुलींना रूमबाहेर जाण्यास सांगितले. यावेळी विद्यार्थिनींमध्ये शाब्दिक चकमक झाली. वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत फोनवरून संवाद झाला, तरी पूर्वीपासून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून तीन विद्यार्थिनींना रूमबाहेर काढण्यात आले.
या सर्व मानसिक व शारीरिक त्रासामुळे एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. तिला रात्री उशिरा विद्यापीठाच्या हेल्थ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या सर्व प्रकरणावरून तीन विद्यार्थिनींनी याबाबत तक्रार अर्ज लिहिला होता. त्यात घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला. तसेच या अर्जात रॅगिंग या शब्दाचा उल्लेख केला आहे.
त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर वसतिगृहात राहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिंनींची योग्य व्यवस्था ठेवली जाते किंवा नाही, याकडे वसतिगृह प्रशासन लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वी मुलींच्या वसतीगृहात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यावरूनही विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले होते. दरम्यान, बुधवारी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संबंधित विद्यार्थिनींची वसतिगृहाच्या इतर खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच वाद घालणाऱ्या मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले असल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तोपर्यंत वसतिगृह प्रशासन काय करत होते?
विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या रूममध्ये राहण्यावरून विद्यार्थिनींमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी तेथे वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु विद्यार्थिनींना रूमबाहेर सामान घेऊन बाहेर काढले जाते. त्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभ्या राहतात. तोपर्यंत विद्यापीठाचे वसतिगृह प्रशासन काय करत होते? असा प्रश्न निर्माण झाला आहे.