

पुणे: महापालिकेची मैदाने आणि मोकळ्या जागांवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी परवानगी देताना त्यांच्याकडून रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे आणि शुल्क आकारावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली आहे. महापालिकेच्या जागांचा व्यावसायिक वापर होत असल्याने त्यातून महापालिकेला महसूल मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शहरात महापालिकेची अनेक मैदाने तसेच आरक्षित मोकळ्या जागा आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या जागांचा ढोल-ताशा पथकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काही ठिकाणी मांडव आणि शेड उभारून दोन ते तीन महिने सराव केला जातो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ध्वनिप्रदूषणासह विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
काही पथकांकडून महापालिकेचे सणस मैदान, नेहरू स्टेडियम तसेच महापालिकेच्या इमारती आणि मोकळ्या जागांवरही अतिक्रमण करून सराव केला जात असल्याचे बालगुडे यांनी सांगितले. यंदाही काही ढोल-ताशा पथकांनी महापालिका प्रशासनाची परवानगी न घेताच शहरातील विविध ठिकाणी शेड उभारून सराव सुरू केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणस मैदान आणि नेहरू स्टेडियम परिसरात काही पथकांनी जागेवर अतिक्रमण करून सराव सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला.
ढोल-ताशा पथकांना ‘सिंगल विंडो’ व्यवस्था
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी आवश्यक जागा आणि प्रशासकीय परवानग्या तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना महापौर मंजूषा नागपुरे यांनी महापालिका प्रशासनाला केली. नदीपात्र, महापालिकेची मोकळी मैदाने तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी पथकांना प्राधान्याने जागा द्यावी.
विविध विभागांच्या स्वतंत्र परवानग्यांऐवजी 'सिंगल विंडो' अथवा सुलभ ऑनलाइन-ऑफलाइन परवानगी व्यवस्था सुरू करावी, वेळेची मर्यादा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधून मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात. नागरिकांची गैरसोय टाळून पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे नागपुरे यांनी सांगितले.
सशुल्क परवानगी देण्याची मागणी
महापौर मंजूषा नागपूरे यांनी महापालिकेने ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी, तसेच सरावाच्या ठिकाणी वीज आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. या सूचनांना आपला आक्षेप नसल्याचे बालगुडे यांनी स्पष्ट केले. मात्र, महापालिका पथारी व्यावसायिकांसह अन्य व्यावसायिकांना जागा वापरण्यासाठी सशुल्क परवानगी देते. त्यातून महापालिकेला महसूल मिळतो. ढोल-ताशा पथकेही व्यावसायिक स्वरूपात काम करतात. कोणतेही पथक मोफत वादन करीत नाही. गणेशोत्सवाच्या काळात ढोल पथकांच्या प्रमुखांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे महापालिकेच्या जागांचा वापर करणाऱ्या ढोल पथकांकडून रेडीरेकनरच्या दरानुसार भाडे आणि शुल्क आकारावे, अशी मागणी बालगुडे यांनी केली आहे.