

पुणे: श्रावण सुरू होण्यापूर्वी मांसाहाराचा मनसोक्त आस्वाद घेत पुणेकर सामिष खवय्यांनी बुधवारी (दि. १२) आखाड साजरा केला. घरगुती खरेदीपेक्षा यंदा हॉटेलमध्ये जाऊन आखाड साजरा करण्याकडे पुणेकरांचा कल अधिक राहिला. त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडून मटण, चिकन आणि मासळीच्या मोठ्या ऑर्डर नोंदविण्यात आल्या. दिवसभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ७०० टन चिकन, २५ ते ३० टन मासळी आणि सुमारे दीड ते दोन हजार बोकडांच्या मटणाची विक्री झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
गुरुवारपासून (दि. १३) श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावणात अनेक कुटुंबांमध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामुळे काही जण थेट दसऱ्यापर्यंत मांसाहार टाळतात. त्यामुळे आषाढातील शेवटच्या दिवशी मांसाहाराचा बेत आखण्याची परंपरा आहे. यंदा आषाढाचा शेवटचा दिवस बुधवारी आल्याने सकाळपासून मटण, चिकन आणि मासळीच्या दुकानांवर खवय्यांची गर्दी दिसून आली. सायंकाळनंतर त्यात आणखी वाढ झाली. मात्र, नोकरी-व्यवसायामुळे घरी बेत करण्याऐवजी अनेकांनी कुटुंबीय आणि मित्रांसमवेत हॉटेलमध्ये आखाड साजरा करण्यास पसंती दिली.
मासळी व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले की, गटारीच्या तुलनेत मासळीला अपेक्षित घरगुती मागणी नव्हती. मात्र, हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी होती. सुरमई, कोळंबी आणि पापलेटला सर्वाधिक पसंती मिळाली. आवक जास्त आणि मागणी तुलनेने कमी राहिल्याने विविध प्रकारच्या मासळीच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी घट झाली. मटण विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले की, रविवारच्या तुलनेत मटणाची मागणी फारशी वाढलेली नव्हती. अनेकांनी मागील आठवड्यातच मांसाहाराचा बेत केला होता.
बुधवारी कामाचा दिवस असल्याने पती-पत्नी दोघेही नोकरी करणाऱ्या कुटुंबांनी घरी स्वयंपाक करण्याऐवजी हॉटेलमध्ये आखाड साजरा करण्यास प्राधान्य दिले. बोकड, बोल्हाई आणि खिम्याची विक्री ८०० रुपये किलो, तर कलेजीची विक्री ८४० रुपये किलो दराने झाली. चिकन व्यावसायिक रूपेश परदेशी म्हणाले, चिकनला मात्र मोठी मागणी होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून बुधवारी सुमारे ७०० टन चिकनची विक्री झाली. सकाळपासून दुकानांवर ग्राहकांची गर्दी होती. मागणीच्या तुलनेत पुरेशी आवक असल्याने दर स्थिर राहिले.
मासे, चिकन कापून देणार्यांना आला भाव
मासळी खरेदी केल्यानंतर ते कापून तसेच स्वच्छ करून देणार्यांकडेही नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. एका किलोला १० रुपये दर आकारून मासळी स्वच्छ करून तसेच कापून देण्याचे काम येथील नागरिक करीत होते. तर, आखाडात घरगुती कार्यक्रमासांठी गावरान कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी राहिली. कोंबडा कापून त्याचे तुकडे करून देण्यासाठी चिकन विक्रेत्यांकडून १०० रुपये दर आकारण्यात येत होते.
मांसाहारी हॉटेलबाहेर खवय्यांच्या रांगा
शहरातील हॉटेलमध्ये खवय्यांची चिकन, मटण, मासळीच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासह तसेच पार्सल नेण्यासाठी शहरातील हॉटेल व दुकानांबाहेर अनेकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. तर, काहींनी ऑनलाइन ऑर्डर बुक करून आखाड पार्टी घरीच साजरी करण्यास प्राधान्य दिल्याचे हॉटेल व्यावसायिक हृषीकेश थोरात यांनी सांगितले.