

कोरेगाव पार्क: पुणे स्टेशन परिसरात असलेले महापालिकेचे तुकाराम शेठ शिंदे वाहनतळ सध्या विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. हे वाहतळ पाच मजली असले, तरी त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. लिफ्टअभावी वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तसेच वाहनतळाच्या बाहेरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहनचालकांना आता येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. हा परिसर रात्र मद्यपींचा अड्डा झाला आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
या वाहनतळाच्या पाठीमागील बाजूस चारचाकी वाहनांचे पार्किंग आहे. मात्र सध्या हे वाहनतळ खासगी वाहनांच्या विळख्यात अडकल्याने पार्किंसाठी वरील तीन मजल्यांवर जाण्यासाठी वाहनांना अडथळा होत आहे. यामुळे हे मजले पार्किंगविना रिकामे राहत आहेत. तळमजल्यावर ठिकठिकाणी कचरा साचला असून, दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचेही चित्र दिसून येत आहे. रात्री या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला आहे.
वाहनतळामध्ये रात्रीच्या वेळी व्यावसायिकांच्या हातगाड्ड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहनांच्या पार्किंगसाठी जागा शिल्लक राहत नाही. वाहनतळाचा ठेकदार हातगाड्ड्या उभ्या करण्यासाठी पैसे आकारत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. वाहनतळावरील स्वच्छतागृहाची सध्या दयनीय अवस्था झाली असल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दुचाकी वाहनांच्या पार्किगमध्ये लिफ्ट नसल्याने पाचव्या मजल्यावरून जिन्याने खाली येताना दुचाकीचालकाची दमछाक होत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रारी येत आहेत.
या वाहनतळाच्या परिसरात पीएमपी बसडेपो असल्याने दिवसरात्र बसची वर्दळ असते. तसेच पोस्ट ऑफिस आणि निवारा प्रकल्पही असल्याने वाहनांचे पार्किंग करण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत आहे. वाहनतळाच्या भोवती पुणे-मुंबईदरम्यान प्रवाशांची वाहतूक करणारे खासगी वाहने उभी केली जात आहेत. मात्र वाहतूक पोलिसांकडून या अनधिकृत पार्किगवर कारवाई केली जात नाही. ससून रस्त्यावर हातगाडी व्यवसायिकांनी आणि रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनतळात पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पुणे स्टेशन परिसरात तुकारामशेठ शिंदे वाहनतळावर येणाऱ्या वाहनचालकांना सध्या विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील अतिक्रमणांमुळे कधी कधी वाहने आत जाण्यासाठी देखील जाग शिल्लक राहत नाही. महापालिका प्रशासनाने या वाहनतळाकडे लक्ष देऊन वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.
चंद्रशेखर लंबुगोल, वाहनचालक
या वाहनतळाबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. सौरउर्जा यंत्रणा आणि लिफ्ट बसविण्यासाठी विद्युत विभागाला कळविले आहे. वाहनतळाच्या बाहेरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्याबाबत वाहतूक विभागाच्या उपायुक्तांशी चर्चा सुरू आहे. या वाहनतळाची लवकरच पाहणी करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दिनकर गोंजारे, मुख्य अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका