

पुणे: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी अलीकडेच अनेकांच्या मुसक्या आवळल्या. तरीही जिल्ह्यातील गांजा तस्करीची साखळी तुटताना दिसत नाही. कारण गांजा तस्करांनी कार्यशैलीच (मोड्स ऑपरेंडी) बदलल्याचे वास्तव पुढे आले आहे.
दैनिक ‘पुढारी'ने केलेल्या पाहणीत आणि अमली पदार्थविरोधी कारवायांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या सिंडिकेटची जागा आता छोट्या आणि गोपनीय नेटवर्कने घेतली आहे, तर काही ठिकाणी राजस्थानी तस्कर व्यवसायाच्या आडून पुण्यात गांजाची विक्री करताना पोलिसांना सापडले आहेत. इतर महागड्या अमली पदार्थाच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. त्यामुळे कामगार वस्त्यांपासून ते उच्चभ्रू परिसरात गांजाची नशा होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पुण्यात गांजा येतो कुठून?
पुण्यात येणारा बहुतांश गांजा हा मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या राज्यांतून येतो. पूर्वी कंटेनर, ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्समधून शेकडो किलो गांजा पुण्यात येत असत. मात्र, पोलिसांच्या कडक कारवाईनंतर तस्करांनी मोठ्या खेपांऐवजी छोट्या खेपांचा मार्ग स्वीकारल्याचे सूत्र सांगतात.
सध्याची परिस्थिती काय?
पोर्शे अपघातानंतर अमली पदार्थांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्याआधी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि कुरकुंभ येथील हजारो कोटींच्या मेफेड्रॉन कारखान्यावर झालेल्या कारवाईने संपूर्ण ड्रग्ज साखळी हादरली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पेडलर्स, पुरवठादार आणि तस्करांवर मोठी मोहीम उघडली. पोलिस आयुक्तालयात पूर्वी पकडलेल्या तस्करांची परेड घेणे, विविध भागांत ‘फ्लशआऊट’ मोहिमा राबवणे असे उपक्रम राबवले. त्यामुळे गांजा तस्करीला काहीसा आळा बसला असला तरी ती पूर्णतः संपलेली नाही.
हायड्रोपोनिक गांजाचे नवे संकट
पुण्यात अमली पदार्थांच्या अवैध बाजारपेठेत आता 'हायड्रोपोनिक गांजा' हे नवे आव्हान ठरत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बंदिस्त फ्लॅट, फार्महाऊस आणि गोडाऊनमध्ये मातीशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गांजाची लागवड केली जात आहे. एलईडी दिवे, नियंत्रित तापमान आणि विशेष पोषक द्रव्यांमुळे उच्च प्रतीचा गांजा तयार होत आहे. थायलंडमधून चोरट्या मार्गानेही गांजा तस्करी वाढल्याचे कस्टम विभागाने मागे केलेल्या कारवायांमध्ये स्पष्ट झाले आहे. सामान्य गांजापेक्षा अनेकपटींनी महाग असलेल्या या गांजाला उच्चभ्रू ग्राहकांकडून मागणी वाढत असल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
‘ड्रग-फ्री पुणे’चे आव्हान कायम
पोलिसांनी गांजा आणि इतर अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेतली असली, तरी तस्करांनी आपले चेहरे आणि मार्ग बदलले आहेत. त्यामुळे केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी ठरणार नाही. नागरिक, पालक, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक प्रतिनिधींनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. अन्यथा, मोठ्या सिंडिकेटच्या जागी निर्माण झालेली ही ‘मायक्रो तस्करी’ भविष्यात अधिक धोकादायक ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गांजा तस्करीकडे तरुणांचा ओढा का वाढला?
एमडीसारखे महागडे सिंथेटिक ड्रग्ज पोलिसांच्या कारवाईमुळे तस्करी कमी होत आहे. परिणामी, कमी किमतीत सहज नशा मिळविण्याचे साधन म्हणून काही व्यसनी युवकांनी गांजाकडे मोर्चा वळविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पुणे हे देशातील मोठे शैक्षणिक केंद्र असल्याने बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर वाढती पब संस्कृती, रात्रीची जीवनशैली आणि सहज पैसा कमावण्याच्या लालसेमुळे काही तरुण गांजा पुरवठा साखळीत ओढले जात असल्याची माहिती समोर येत आहे.