

शंकर कवडे
पुणे: उन्हाळ्याच्या परिणामामुळे फळभाज्यांची घटलेली आवक सलग दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने शेवगा, मटार, कोहळा आणि पावटाच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, मागणी कमी झाल्याने काकडी, हिरवी मिरची, टोमॅटो आणि भेंडीच्या भावात सुमारे पाच टक्क्यांची घट झाली आहे. दरम्यान, मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल असल्याने इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात (दि. १४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश येथून १३ ते १४ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५, घेवडा २ ते ३ टेम्पो घेवडा, कर्नाटक २ टेम्पो भुईमुग शेंग,
इंदौर येथून गाजर १० टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे ९ ते १० टेम्पो, इंदौर, आग्रा, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाटा ४५ टेम्पो इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेटस, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर १२ टेम्पो, तांबडा भोपळा १२ टेम्पो, घेवडा, पावटा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमुंग शेंग ५० गोणी, कांदा सुमारे ८० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डमधील आडते निखिल भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांचे भाव स्थिर
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका उत्पादनाला बसत असून, त्यामुळे पालेभाज्यांची आवक नेहमीपेक्षा कमी होत आहे. मागील आठवड्यात कोथिंबिरीची १ लाख १० हजार जुडी आवक झाली होती. ती घटून ९० हजार जुडींवर आली आहे. मात्र, मेथीची आवक ४० हजार जुडींवर स्थिर राहिली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे उत्पादन कमी झाल्याने परजिल्हा आणि परराज्यांतून पालेभाज्यांची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीला दर्जानुसार प्रतिजुडी ८ ते १५ रुपये भाव मिळत आहे.