

पुणे: सरकारी नोकरी मिळणे हे अनेक तरुण-तरुणींचे स्वप्न असते. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर मिळालेली ही नोकरी आयुष्याला नवे वळण देते. मात्र, एका दाम्पत्याच्या आयुष्यात हीच सरकारी नोकरी त्यांच्या संसाराच्या अंताचे कारण ठरली. लग्नाच्या एक महिन्याच्या आत पत्नीला सरकारी नोकरी लागली. यादरम्यान, तिच्या अपेक्षा उंचावल्याने दाम्पत्यांमधील संवाद तुटला. अखेर क्रुरतेच्या आधारावर दाखल केलेला दावा परस्पर संमतीने घटस्फोटात रूपांतरीत होऊन निकाली निघाला.
विदर्भातील वैभव आणि वैभवी (नावे बदललेली) यांचा मे २०२३ मध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. लग्नानंतर नव्या संसाराची सुरुवात उत्साहात झाली होती. पुण्यातील खासगी नोकरी करणाऱ्या वैभवसोबत वैभवीही आनंदाने राहत होती. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच लग्नाच्या अवघ्या महिनाभरात एक आनंदाची बातमी आली. लग्नापूर्वी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत वैभवीला यश मिळाले आणि तिला सरकारी नोकरी लागली.
कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण होता. मात्र, नोकरीमुळे वैभवीला विदर्भात रुजू व्हावे लागले आणि इथूनच दोघांमधील अंतर वाढू लागले. भौगोलिक अंतरासोबतच संवादाचे अंतरही वाढत गेले. पतीच्या म्हणण्यानुसार, नोकरी लागल्यानंतर पत्नीचा त्याच्याशी आणि सासरच्या मंडळींशी संपर्क कमी झाला. कालांतराने मतभेद वाढले आणि नात्यातील दुरावा अधिक गडद होत गेला.
लग्नानंतर दोन वर्षांहून अधिक काळ दोघे वेगळे राहत होते. अखेर वैभवने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात क्रूरतेच्या आधारावर घटस्फोटासाठी दावा दाखल केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोघांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनीही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला.
स्वप्नपूर्तीच्या अत्यानंदात संसाराची लागली वाट
न्यायालयाने या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर केल्यानंतर पत्नीला तिचे सर्व स्त्रीधन परत देण्यात आले, तर तिने पोटगीचा हक्क सोडला. एका स्वप्नपूर्तीने करिअरला नवी दिशा दिली; पण त्याचवेळी एका संसाराची वाट मात्र कायमची वेगळी झाली. त्यामुळे सरकारी नोकरीचा आनंद आणि तुटलेल्या नात्याची खंत अशी दोन्ही बाजू या प्रकरणातून समोर आल्या आहेत.