

पुणेः शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ट्रेडींगद्वारे चांगला नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी तिघांना 49 लाख 35 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केट ट्रेडींगद्वारे सायबर चोरट्यांनी 29 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी, शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सायबर चोरट्याने फिर्यादींशी संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळले.
तर दुसऱ्या घटनेत आंबेगाव येथील 38 वर्षीय महिलेची देखील अशाच प्रकारे 13 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी, महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींचा विश्वास संपादन करून सायबर चोरट्याने शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी 13 लाख 40 हजार घेतले. तर फुरसूंगी येथील एका 41 वर्षीय व्यक्तीला सुद्धा सायबर ठगांनी 6 लाख 47 हजार रुपयांचा शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या बहाण्याने गंडा घातला आहे. याप्रकरणी, फरसूंगी पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सायबर ठगांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सोशल मीडिया पाहत असताना, त्यांना सायबर ठगाने आपल्याकडील व्हॉटस् अप ग्रुपमध्ये ॲड करून घेतले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.