

Mundhwa Land Scam: मुंढवा येथील कोट्यवधींच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर पहिली अटक झाली आहे. या प्रकरणात शीतल किसनचंद तेजवानीला पुणे पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून ती गायब होती, तसेच ती परदेशात गेल्याच्या चर्चाही सुरु होत्या. परंतु पोलिसांनी अचानक तिला अटक करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
माहितीनुसार, तेजवानीची आतापर्यंत दोन वेळा सखोल चौकशी झाली होती. त्या चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहार, दस्तऐवजातील फेरफार आणि जमिनीवरील हक्क दाखवण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांतील अनियमितता उघडकीस आल्याचा दावा तपास पथकाने केला आहे. प्राथमिक पुरावे सापडल्यानंतरच अटकेचा निर्णय घेतल्याचे पोलीस सांगत आहेत.
मुंढवा प्रकरणाशी संबंधित बावधन आणि खडक पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे तेजवानी विरोधात दाखल आहेत. खडक येथील गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आता या तपासाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईओडब्ल्यूकडे (Economic Offences Wing) गेल्यानंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचे स्रोत आणि संबंधित कंपन्यांचा तपास अधिक बारकाईने होणार आहे.
या संपूर्ण प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार याच्याशी संबंधित ‘अमेडिया’ कंपनीचे नाव. या कंपनीचा काही दस्तऐवजांमध्ये संदर्भ आढळल्याने तपास पथकाने सांगितले. अद्याप कंपनी विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसली, तरी चौकशी होऊ शकते.
शीतल तेजवानीच्या अटकेनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास पथकाने व्यक्त केली असून, मुंढवा जमीन व्यवहारातील संपूर्ण जाळे आता उघडे पडण्याची चिन्हे दिसत आहेत.