

बारामती : नवीन संचमान्यतेमुळे हजारो शाळांवरील शिक्षकांची पदे कमी करणे, दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती, ऑनलाइन अशैक्षणिक कामांचा भडीमार या बाबींमुळे संतापलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
यातून शुक्रवारी (दि. 5) राज्यभरातील शाळा बंद राहणार आहेत. या दिवशी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे व शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांनी दिली.
दोन वर्षापासून संचमान्यतेमुळे राज्यभरातील 20 हजारहून अधिक पदे कमी होणार आहेत. त्यातच 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून मार्ग काढला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रमुख संघटनांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती तयार करण्यात आली आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यभर 5 डिसेंबर रोजी शाळा बंद करण्याचे व जिल्हास्तरावर मोर्चाचे आवाहन केले आहे.
पुणे येथील नवीन जिल्हा परिषद कार्यालयापासून शुक्रवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता मोर्चास प्रारंभ होईल. विभागीय आयुक्त कार्यालय, शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त कार्यालय या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश महामोर्चाचा समारोप होईल.
प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, शिक्षक भरती व केंद्रप्रमुख संघटना, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षक संघ, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक सेना यांच्यासह राज्यभरातील प्रमुख मोठ्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
प्रचंड ऑनलाइन शैक्षणिक कामांचा भडीमार, संचमान्यतेतून शिक्षक कपातीचे धोरण, तसेच टीईटी सक्तीमुळे प्रचंड तणावातील शिक्षक यामुळे मराठी शाळा वाचविण्यासाठी संघटनेने 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
बाळासाहेब मारणे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राज्यातील सर्व प्रमुख मोठ्या संघटना प्रथमच एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्या आहेत. शासनाने शिक्षण क्षेत्रातील अडचणींची तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.
नंदकुमार होळकर, राज्य कोषाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती
संच मान्यतेच्या जाचक निर्णयामुळे माध्यमिक शाळांचे कंबरडे मोडणार आहे. त्यामुळे या आंदोलनात माध्यमिक शिक्षकांच्या सर्व संघटना उतरल्या आहेत. 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद राहतील.
नंदकुमार सागर, राज्य सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ