

भोर : भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगळवारी (दि. 2) 77 .99 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शाळा नंबर 2 मध्ये बूथवरून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
हा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. शहरातील 16 हजार 716 मतदारांपैकी 12 हजार 870 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सखी मतदान केंद्रांची उभारणी केली होती. मतदारांनी थंडी असली तरी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. कार्यकर्त्यांची मतदारांना ने-आण करण्याची लगबग सुरू होती. वयोवृद्ध तसेच अपंग मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून व्हील चेअरची सोय करण्यात आली होती. उमेदवारांकडून खाजगी रिक्षा, कार, टू-व्हीलर यांची सोय करून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत सर्व मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली. बाहेरगावी जाणाऱ्या बहुतांशी मतदारांनी सकाळी मतदान केले.
भोर शहरातील 22 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. एका बूथवर जास्त गर्दी झाल्याने बूथ बाहेर काढण्यावरून राष्ट्रवादी व भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाली. मतदान केंद्रावर आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी कार्यकर्त्यांसोबत तळ ठोकला होता. शहरातील 22 मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मतदान पार पडल्यानंतर कोणाला कौल मिळेल याची शहरात चर्चा सुरू झाली आहे.