

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे महानगरपालिकेच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. संपूर्ण शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून, चौकाचौकांत जीवघेणे खड्डे पडले आहेत. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, नगर रस्ता, बाणेर, औंध, कोथरूड, हडपसर, कात्रज, वडगाव शेरी, येरवडा, विमाननगर, वारजे आदी भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडले असून, दररोज शेकडो लहान-मोठे अपघात घडत आहेत. ‘डांबराचा तुटवडा’ असल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने हात वर केले आहेत.
पुण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. पाण्यामुळे काही रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवणे अपेक्षित असताना डांबराचा तुटवडा असल्याने काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदार केवळ 'कोल्ड मिक्स' तंत्रज्ञानाचा वापर करून मलमपट्टी करीत आहेत. परंतु, पहिल्याच पावसात हे कोल्ड मिक्स वाहून जात असल्याने रस्त्यावर पुन्हा खडी पसरत आहे. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि सीसीटीव्ही नेटवर्कसाठी करण्यात आलेली रस्तेखोदाई कंत्राटदारांनी योग्यरीतीने बुजवली नाही. यामुळे देखील शहरातील रस्ते खराब झाले आहेत.
खड्डेदुरुस्तीचे कोट्यवधी पाण्यात
महापालिकेने यंदा कोट्यवधींचे बजेट नालेसफाई आणि रस्तेदुरुस्तीसाठी मंजूर केले होते, परंतु ते सर्व पैसे खरोखर कुठे मुरले? असा सवाल सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, यात तासन्तास नागरिक अडकून पडत आहेत. जर दरवर्षी पुणेकरांना याच खड्ड्यांतून प्रवास करायचा असेल, तर महापालिका कोट्यवधींचा कर का वसूल करते? असा सवाल सामान्य पुणेकर विचारत आहेत.
प्रशासनाचे ‘रोडमित्र’ देखील कोमात!
नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार नोंदवता यावी, यासाठी तयार करण्यात आलेले महापालिकेचे अधिकृत 'पीएमसी रोडमित्र' हे मोबाईल ॲप देखील तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहे. तक्रार करण्याचे माध्यमच बंद पडल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दाद कुठे मागावी? हे समजेनासे झाले आहे.
डांबराचा तुटवडा असल्याने शहरातील खड्डे बुजवण्यास विलंब झाला आहे. कोचीवरून डांबर मागवण्यात आले असून, शहरातील खड्डे तातडीने बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोडमित्र ॲप देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांची तक्रार नोंदवता येणार असून, त्याची तातडीने दखल घेतली जाणार आहे.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका