

शंकर कवडे
पुणे: पावसामुळे फळभाज्यांचे शेतात नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काढणीचा वेग वाढविला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात होत आहे. मात्र, पावसाच्या अनुषंगाने शहरातील किरकोळ विक्रेते सावध भूमिका घेत आवश्यक तेवढ्याच मालाची खरेदी करीत आहेत.
परिणामी, बाजारात अपेक्षित उठाव नसल्याने टोमॅटो, लसूण, सातारी आले, भेंडी, दोडका, दुधी भोपळा, काकडी, फ्लॉवर, वांगी, ढोबळी मिरची, शेवगा, घेवडा, भुईमूग शेंग आणि पावटाच्या घाऊक दरात दहा ते वीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे, आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कांदा, कोबी, नवलकोल, सुरण आणि तोतापुरी कैरीच्या दरात वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून हिरवी मिरची ८ ते १० टेम्पो, कर्नाटकातून कोबी ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश व कर्नाटकातून घेवडा ४ टेम्पो, कर्नाटकातून भुईमूग शेंग १ टेम्पो, इंदौरहून गाजर ८ ते १० टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून तोतापुरी कैरी २ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, हिमाचल प्रदेशातून मटार २०० गोणी, मध्य प्रदेशातून लसूण १५ ते १६ टेम्पो, तर इंदौर, आग्रा व स्थानिक भागातून मिळून बटाटा ६० ते ६५ टेम्पोची आवक झाली.
स्थानिक भागातून सातारी आले ५०० ते ५५० गोणी, भेंडी ६ ते ७ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो ७ ते ८ हजार क्रेट्स, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, घेवडा व पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, शेवगा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी आणि कांदा सुमारे ८० टेम्पो इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांची दरवाढ
जिल्ह्यासह पुणे विभागात सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाज्यांची घटलेली आवक कायम आहे. त्यातही होणाऱ्या मालामध्ये दर्जाहीन आणि खराब मालाचे प्रमाण मोठे आहे. ग्राहकांकडून केवळ दर्जेदार मालाला मागणी आहे. आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, मुळे, पालक आणि कांदापातच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि.१९) कोथिंबीरची दीड लाख जुडी आणि मेथीची ८० हजार जुडी आवक झाली. कोथिंबिर आणि मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार अनुक्रमे २० ते ४० रुपये आणि १० ते २५ रुपये भाव मिळत असल्याची माहिती पालेभाज्यांचे व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.