Akshar Wari: संत नामदेव महाराज: भागवत धर्माची पताका देशभर पोहोचविणारे श्रेष्ठ संतकवी

माऊलींच्या समाधीनंतर भक्ती परंपरा जपली; पंजाबपर्यंत विठ्ठलभक्तीचा संदेश पोहोचविणाऱ्या संत नामदेवांचे अलौकिक कार्य
Akshar Wari
Akshar WariPudhari
Published on
Updated on

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन असणाऱ्या संत नामदेव महाराजांनी माऊलींच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत भक्ती परंपरा जतन करण्याचे महत्कार्य केले होते. त्यांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले होते. स्वत:ला ‘नाम्याची दासी’ असे म्हणणाऱ्या संत जनाबाई या त्यांच्या मोठ्या परिवारातील एक सदस्य होत्या. संत नामदेव हे मराठी संतांच्या मांदियाळीमधील श्रेष्ठ संतकवी आणि भागवत धर्माचे आद्य प्रचारक होते. म्हणूनच संत निळोबारायांनी त्यांचे यथार्थ समर्पक वर्णन केले आहे.

Akshar Wari
Akshar Wari: ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान आणि विज्ञान

'जगद्गुरु तुका अवतार नामयाचा। संप्रदाय सकळांचा येथुनीया॥' त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात भ्रमण करून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे महत्कार्य स्वकर्तृत्वाने पूर्णत्वास नेले. कारण 'नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी॥' हे त्यांचे जीवनातील सर्वोच्च उद्दिष्ट होते. त्यांनी महाराष्ट्रात किंबहुना भारतभर सर्व जाती-पातीच्या, धर्माच्या संतांचे संघटन करून समता, बंधुता आणि एकता प्रस्थापित करून विश्वकल्याणाचे स्वप्न सत्यात उतरवले.

पंजाबमधील त्यांच्या कार्यामुळे ते तेथील बांधवांना आपलेसे वाटतात. शीख बांधवांमध्ये त्यांचे 'नामदेव बाबा' म्हणून नाव प्रचलित आहे. त्यांचे बासष्ट अभंग नामदेवजीकी मुखबानी म्हणून शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित समाविष्ट करण्यात आले आहेत. संत नामदेवांनी मराठी भाषेमध्ये अभंग या छंदाची निर्मिती केली. त्यांनी सुमारे २५०० अभंगांची रचना केली आहे. त्यांना भारतातील विविध भाषांचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्यांनी मराठी, कानडी, मुसलमानी, कोकणी, गुजराती अशी पाच भाषेतील एक गवळण लिहिली आहे. त्यांनी पंजाबी आणि व्रज भाषांमध्ये देखील काव्य रचना केली आहे. 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा...' ही वारकरी संप्रदायात गायली जात असलेली परब्रह्म श्रीविठ्ठलाची आरती संत नामदेवांची भक्तीरसपूर्ण रचना आहे.

Akshar Wari
Akshar Wari: ज्ञानेश्वरीत विज्ञानाची बीजे? गुरुत्वाकर्षणापासून गतीच्या नियमांपर्यंत माऊलींचे विचार

संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार आणि चरित्रकार मानले जाते. त्यांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र प्रतिपादीत केले आहे. 'नामदेव कीर्तन करी। पुढे देव नाचे पांडुरंग॥' असे त्यांचे भक्ती सामर्थ्य अलौकिक होते. भागवत धर्माचे कळस असलेल्या जगद्गुरु तुकोबारायांना अभंग रचनेची प्रेरणा आणि आज्ञा संत नामदेवांनी स्वप्नात येऊन दिली होती. इ. स. १३५० मध्ये आषाढ वद्य त्रयोदशीस पंढरपुरमधील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पायरीवर ते श्री पांडुरंगा चरणी समाधीस्थ झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news