

आशिष देशमुख, निनाद देशमुख, सुनील जगताप, प्रसाद जगताप, शिवाजी शिंदे, महेंद्र कांबळे, शंकर कवडे, सुवर्णा चव्हाण
पुणे: शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अक्षरशः 'स्फोटक' ठरला. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांसमोरील मोकळ्या जागेत (वेलमध्ये) धाव घेत हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. रस्त्यात खड्डा, की खड्ड्यात रस्ता?, ‘पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत, खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे आणि रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामुळे काही काळ सभेचे कामकाज विस्कळीत झाले आणि सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पर्यावरण अहवाल सादर होण्यापूर्वीच विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे गटनेते काका चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)चे गटनेते नितीन गावडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आणि काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत आंदोलन छेडले.
नगरसेवकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत महापौरांच्या व्यासपीठासमोरील मोकळ्या जागेत ठिय्या दिला. 'पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत', 'खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे', 'रस्ते आमच्या हक्काचे... नाही कोणाच्या बापाचे', अशा घोषणा देत विरोधकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. घोषणांनी काही काळ संपूर्ण सभागृह दणाणून गेले. यावेळी विरोधकांनी शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप केला. प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तातडीने सर्व खड्डे बुजविण्याची मागणी केली.
धोकादायक खड्ड्यांमुळे वानवडीकर त्रस्त
पावसाळ्यामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून, वानवडी परिसरातील रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. विशेषतः वानवडी बाजार येथील महादजी शिंदे हायस्कूलजवळील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. येथे शाळा असल्याने रोज विद्यार्थी, पालक आणि नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच, वानवडी भागातील अनेक रस्त्यांवर खड्डे झाले आहेत.
महादजी शिंदे शाळेजवळील रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. चारचाकी वाहनांनाही या खड्ड्यांमुळे मोठा फटका बसत असून, वाहतूक संथगतीने सुरू आहे. वानवडी भागात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिकेने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, तसेच पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजीनगर परिसरातील रस्ते खड्ड्यांच्या विळख्यात
ड्रेनेजलाइन खचणे, पेव्हर ब्लॉक उखडल्याने शिवाजीनगर परिसरातील अनेक रस्ते सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडले आहेत. छोट्या तसेच मोठ्या स्वरूपात निर्माण झालेल्या या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांसह वाहनचालकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
शिवाजीनगर परिसरातील वडारवाडी, मॉडेल कॉलनी, पाटील इस्टेट, हनुमाननगर, पुलाची वाडी आदी भागांमध्ये ड्रेनेजलाइन खचल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी खचलेल्या भागाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, सततचा पाऊस आणि वाढती वाहतूक यामुळे ही डागडुजी टिकत नसून त्याभोवती पुन्हा छोटे-मोठे खड्डे तयार झाले आहेत. परिणामी, रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉकची झीज झाल्याने तसेच ब्लॉक खाली बसल्याने रस्ते ओबडधोबड झाले आहेत. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी वाहने अडकू नयेत म्हणून खड्ड्यांमध्ये विटा, दगड किंवा ब्लॉक टाकून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हा उपाय फार काळ टिकत नसल्याने नागरिकांची समस्या कायम आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू असतानाच या धोकादायक खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
केशवनगर-मुंढव्यातील रस्त्यावर खड्डेच खड्डे
शहराच्या उपनगरात असलेल्या केशवनगर-मुंढवा भागातील रस्त्यावर पावसामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड झाले आहेच. शिवाय नागरिकांना चालणे देखील अशक्य झाले आहे. महापालिकेच्या रस्ते विभागाने कच्च्या प्रकारचे डांबर टाकून रस्ता तयार केल्यामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे.
मुंढवा-केशवनगर आणि आसपासच्या भागात माहिती-तंत्रज्ञान सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्यामुळे वाहनांची गर्दी देखील वाढली आहे. तसेच या भागात बांधकामे वाढलेली आहेत. त्याचाही फटका या भागात असलेल्या रस्त्यांना बसलेला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढ्ले आहे. विशेषत: मुंढवा भागातील ताडीगुत्ता ते वडबन आणि मुंढवा गावातील लोणकर शाळा या भागातील मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर केशवनगर भागातील मांजरी रस्त्यासह केशनवगर चौकात खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. याकडे महापालिकेने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सिंहगड रस्त्यावर खड्ड्यांची नव्हे; तर खचलेल्या चेंबरची धास्ती
सिंहगड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना सध्या खड्ड्यांपेक्षाही रस्त्यावर काही ठिकाणी खचलेल्या आणि असमान झालेल्या चेंबरची (मॅनहोल) मोठी धास्ती आहे. नांदेड सिटी ते स्वारगेटदरम्यानच्या सिंहगड रस्त्यावर दै. 'पुढारी'ने बुधवारी (दि.२९) पाहणी केली असता, या रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर रस्त्याशी समांतर नसल्याचे, तर काहींची झाकणे धोकादायक अवस्थेत असल्याचे दिसून आले.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यानंतर हे खचलेले चेंबर आणि त्यांची खराब झालेली झाकणे सहजासहजी दिसून येत नाहीत. अशा वेळी चेंबरचे झाकण निखळल्यास अथवा तुटल्यास दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. अंधारात किंवा साचलेल्या पाण्यामुळे हे चेंबर थेट मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता आहे.
महापालिका आणि संबंधित प्रशासनाने सिंहगड रस्त्यावरील सर्व चेंबरच्या झाकणांची तातडीने पाहणी करावी, धोकादायक झाकणे तत्काळ बदलावीत आणि सर्व चेंबर रस्त्याला समांतर करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ससाणेनगर ते हांडेवाडी चौकादरम्यान रस्ताच हरवला
पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ससाणेनगर-श्रीराम चौक ते हांडेवाडी चौक, सय्यदनगर ते ससाणेनगर अंडरग्राउंड बायपास, सय्यदनगर ते उंड्री बायपास तसेच मोहम्मदवाडी रस्ता ते कृष्णानगरमार्गे साळुंखे विहार या मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालण्याचेही आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.
खड्ड्यांमुळे अपघात, वाहतूक कोंडी आणि वाहनांचे नुकसान नित्याचे झाले असून, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. श्रीराम चौकातील फिफ्थ ॲटीजवळ मुख्य चौकातच मोठा खड्डा पडला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने हा खड्डा वाहनचालकांच्या नजरेस पडत नाही. परिणामी बरेच दुचाकीस्वार पाण्याने खड्डा भरल्याने व खड्ड्याचा अंदाजन आल्याने अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या खड्ड्यामुळे श्रीराम चौक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महंमदवाडी रस्त्यावरून कृष्णानगरकडे जाणाऱ्या पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यातच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. बऱ्याच दिवसापासून कृष्णानगरकडे जाणारा रस्ता अर्धवटच तयार करण्यात आला आहे. हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असाही नागरिकांकडून पश्न उपस्थित केला जात आहे. सिंपली सिटी ते हांडेवाडी चौक या संपूर्ण मार्गावर लहान-मोठ्या खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले असून, पावसामुळे त्यात अधिक वाढ झाली आहे. रोज हजारो नागरिक या मार्गांचा वापर करत असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पावसाळा सुरू असतानाच रस्त्यांची दुरवस्था अधिक गंभीर बनल्याने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हडपसर परिसरात खड्ड्यांचे ‘साम्राज्य’
पुण्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या हडपसर आणि परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी व स्थानिक नागरिकांची मोठी दुरवस्था झाली आहे. पुणे-सोलापूर महामार्ग, गाडीतळ चौक, हंडेवाडी रस्ता, सासवड रस्ता, मगरपट्टा-मुंढवा मार्ग तसेच माळवाडी, ससाणेनगर आणि गोंधळेनगरमधील अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
उड्डाणपुलाखालील आणि चौकांमधील खोल खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वार घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. केबल व जलवाहिन्यांच्या खोदकामांनंतर रस्ते व्यवस्थित न बुजवल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. प्रशासनाकडून केवळ खडी व माती टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असली, तरी पहिल्याच पावसात ती वाहून जाते.
खड्डे चुकवताना होणाऱ्या अपघातांमुळे आणि ऐन गर्दीच्या वेळी तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने आयटीयन्स, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक हैराण झाले आहेत. या सर्व मार्गांवर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, तातडीने दर्जेदार डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ते खड्डेमुक्त करावेत, अशी तीव्र मागणी नागरिक व वाहनचालकांकडून केली जात आहे.