

अशोक शेंगाळे
भीमाशंकर: आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील माळीण येथे ३० जुलै २०१४ रोजी घडलेल्या भीषण भूस्खलनाला यंदा १२ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्या दुर्घटनेच्या जखमा आजही ग्रामस्थांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. जोरदार पाऊस सुरू झाला की अनेकांना मध्यरात्री दचकून जाग येते आणि ३० जुलै २०१४ चा तो काळजाचा ठोका चुकवणारा दिवस डोळ्यांसमोर उभा राहतो. क्षणात सोन्यासारखे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि १५१ निष्पाप ग्रामस्थांचा मृत्यू झाला. त्या आठवणी आजही अंगावर शहारे आणतात.
दुर्घटनेपूर्वीचे माळीण गाव गुण्यागोविंदाने नांदणारे, हसते-खेळते होते. एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले. त्या दिवशी गावाबाहेर, शेतात किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले काहीजण नशिबाने बचावले; मात्र, लहान मुले, वृद्ध, महिला आणि कुटुंबातील अनेक सदस्य कायमचे हिरावले गेले. अनेकांनी आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, पती, मुले अशा संपूर्ण कुटुंबीयांना गमावले. अनेक कुटुंबे बेघर झाली, नातीगोती तुटली आणि आयुष्याची घडीच विस्कटली.
दुर्घटनेनंतर नव्या गावठाणात पुनर्वसन झाले. आधुनिक सुविधा असलेली घरे उभी राहिली; मात्र, जुन्या गावाशी असलेली भावनिक नाळ अजूनही तुटलेली नाही. "नवीन गावात सर्व सुविधा असल्या तरी मन अजूनही जुन्या माळीणमध्येच अडकले आहे. त्या वेदना विसरणे अशक्य आहे," अशी भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करतात.
पुनर्वसनानंतरही अनेक मूलभूत प्रश्न कायम असल्याची ग्रामस्थांची खंत आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही भटकंती करावी लागते. पाणीपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागलेला नाही. स्मृतिस्तंभ परिसरातील निवारा शेडचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, पेव्हिंग ब्लॉकही व्यवस्थित बसविण्यात आलेले नाहीत. नवीन गावठाणातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाल्याची नाराजी शिवाजी लेंभे यांनी व्यक्त केली.
पुनर्वसनात ४८ घरे वाटप करण्यात आली असली, तरी अनेक घरांना गळती व ओलाव्याचा त्रास होत आहे. या त्रुटी दूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दुर्घटनेतील १३ कुटुंबांना अद्याप घरे मिळालेली नसल्याचेही सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्याचे बोअरवेल व विहिरीचे स्रोत निष्प्रभ झाल्याने उन्हाळ्यात टँकरवर अवलंबून राहावे लागते. काही वेळा जुन्या गावाजवळील विहिरी, हातपंप किंवा नदीपात्रात खड्डे खोदून पाणी आणण्याची वेळ येते.
जोरदार पाऊस सुरू झाला की नवीन गावठाणातही भीतीचे वातावरण निर्माण होते. भराव खचतील, पाण्याचे लोट येतील, घरांना गळती लागेल, अशी भीती ग्रामस्थांच्या मनात कायम आहे. 'जुन्या आठवणी आजही ताज्या होतात; पण धीर धरून जगण्याशिवाय पर्याय नाही,' अशी भावना कुमाजी लेंभे व मच्छिंद्र झांजरे यांनी व्यक्त केली, तर आसाणे पाईर डोहाचे पाणी नवीन माळीणला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. जुन्या गावात गेल्यानंतर हसत-खेळत बागडणारी मुले, कुटुंबे आणि गजबजलेले गाव डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या
नवीन गावठाणाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा
आसाणे पाईर डोहाचे पाणी नवीन माळीणपर्यंत आणावे
स्मृतिस्तंभ परिसरातील निवाराशेडचे निकृष्ट काम दुरुस्त करावे
पेव्हिंग ब्लॉक व मुख्य रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी
घरांतील गळती व ओलाव्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा
उर्वरित पात्र कुटुंबांना घरे द्यावीत