

पुणे : शास्त्रीय गायनापासून नाट्यगीतापर्यंत... अभंगापासून भजनापर्यंत... अशा अस्सल गायकीचा नजराणा रसिकांसमोर ख्यातनाम गायक पंडित रघुनंदन पणशीकर आणि गायिका विदुषी मंजूषा पाटील यांनी सादर केला अन् या स्वरप्रवासाने रसिकांना सुरांची दिवाळी अनुभवायला मिळाली. रसिकांच्या उत्स्फूर्त गर्दीने खचाखच भरलेल्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने ‘मंगल स्वरांची सूरमयी मैफल : दिवाळी स्वरसंध्या’चे शनिवारी (दि. 18) आयोजन केले होते. पं. रघुनंदन पणशीकर आणि मंजूषा पाटील यांनी सुरेल रचना सादर करून रसिकांना स्वरानंद दिला. धनत्रयोदशीच्या दिवशी रंगलेल्या या स्वरांच्या आतषबाजीने पुणेकर रसिकांची दिवाळी सुरेल केली अन् दोघांच्याही दमदार गायकीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दिवाळीनिमित्त सप्तसुरांनी रंगलेला स्वरसोहळा रसिकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.(Latest Pune News)
दै. ’पुढारी’ माध्यम समूहाच्या वतीने धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी या कार्यक्रमाचे कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजन केले होते आणि या कार्यक्रमात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या अनुभवसंपन्न गायकीने, तर मंजूषा पाटील यांच्या बहारदार गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे कुलगुरू मुकुंद कुलकर्णी, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक हर्षद झोडगे, ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. अभिजित आवटी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, कोहिनूर ग्रुपपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, अमर बिल्डर्सचे देवेंद्र पेशवे, नाईकनवरे बिल्डर्सचे संचालक रणजित नाईकनवरे या प्रायोजकांसह दै. ’पुढारी’ पुणेचे सरव्यवस्थापक सुनील लोंढे, दै. ’पुढारी’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी, दै. ’पुढारी’च्या पुणे युनिटचे मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, एचआर हेड आनंद कुलकर्णी, वितरण व्यवस्थापक वैभव जाधव आदी उपस्थित होते. मुख्य प्रायोजक विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, एज्युकेशन पार्टनर ट्रिनिटी ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ॲकॅडमिक पार्टनर सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, सहप्रायोजक कोहिनूर ग्रुप, अमर बिल्डर्स, नाईकनवरे बिल्डर्स आणि संजय काकडे ग्रुप यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
विदुषी मंजूषा पाटील यांच्या दमदार गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी राग बिहागमधील ’लट उलझी सुलझा जा रे मोहन...’ ही बंदिश सादर केली. त्यांची बहारदार गायकी आणि जोडीला जयकिशन यांच्या बासरीच्या मधुर स्वरांनी रसिकांना मोहित केले. पहिल्याच रचनेच्या सादरीकरणाने दिवाळीची रात्र सप्तसुरांनी सजल्याची अनुभूती दिली. मंजूषा पाटील यांच्या गायकीतील आक्रमकतेसह त्यातील मधुरताही रसिकांची मने जिंकून गेली. त्यानंतर स्वरसूत्रे हाती आल्यानंतर पं. रघुनंदन पणशीकर यांच्या अनुभवसंपन्न गायकीचा प्रत्यय रसिकांनी अनुभवला. ’सहेला रे, आ मिल गाये’, ’सप्तसुरन के भेद सुनाये...’ही रचना त्यांनी आपल्या स्वरांनी सजवली आणि रसिकांनी त्यांच्या गायकीला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. दोघांच्याही सुरेल गायनाने दिवाळीची रात्र खास बनली आणि त्यानंतर सादर झालेल्या एकापेक्षा एक रचनांनी रसिकांचा दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणित झाला. स्नेहल दामले यांच्या औचित्यपूर्ण आणि बहारदार निवेदनाने कार्यक्रमाचा रंग वाढविला.
त्यानंतर मंजूषा पाटील यांनी ’रंगी सारी गुलाबी चुनरिया रे...’ ही रचना सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली. त्यानंतर रसिकांना त्यांच्या आवडत्या नाट्यगीतांची सुरेल मेजवानी अनुभवायला मिळाली. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली ’संगीत मत्स्यगंधा’मधील ’गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी...’ हे नाट्यगीत पं. रघुनंदन पणशीकर यांनी सादर केले आणि हे नाट्यगीतही रसिकांची दाद मिळवून गेले. पं. पणशीकर यांच्या गायकीतील वैविध्यता या वेळी रसिकांनी अनुभवली. मध्यंतरानंतर सादर झाल्या त्या रसिकांच्या आवडत्या रचना. दिवाळीचे निमित्त आणि रसिकांच्या आवडीच्या रचनांनी रसिकांना स्वरांची मेजवानी दिली. रसिकांच्या आग्रहास्तव मंजूषा पाटील यांनी ’अबीर गुलाल उधळीत रंग’ हा अभंग सादर केला आणि रसिकांनी हात उंचावून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या गायकीला दाद दिली. या वेळी प्रथमेश तारळकर यांनी सादर केलेल्या पंखवाजवादनाने रसिकांचे लक्ष वेधले. या अभंगाला रसिकांकडून वन्समोअरही मिळाला. सप्तसुरांची उधळण काय असते, याची प्रचिती रसिकांनी या वेळी घेतली. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त खळे यांनी संगीतबद्ध केलेली ’बाजे रे मुरलिया बाजे...’ हे भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील भजन पं. पणशीकर यांनी सादर केले अन् त्यांच्या गायकीला मिळालेली जयकिशन यांच्या बासरीची साथ खास ठरली. रसिकांच्या आग्रहास्तव पं. पणशीकर यांनी हे भजन पुन्हा एकदा सादर केले.
त्यानंतर स्वरांची बरसात केली ती मंजूषा यांच्या गायकीने. रसिकांच्या सर्वांत पसंतीच्या ’जोहार मायबाप जोहार...’ या अभंगाने तर या कार्यक्रमाची रंगत वाढवली. मंजूषा यांच्या स्वरात स्वर मिसळत रसिकांनीही या अभंगाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या आधीच मंजूषा यांना रसिकांनी ’अबीर गुलाल उधळीत रंग...’, ’जोहार मायबाप जोहार...’, ’या सुरांनो चंद्र व्हा...’ या रचना गाण्यासाठी फर्माईश केली होती, रसिकांची फर्माईश पूर्ण करीत मंजूषा यांनीही रसिकांच्या आवडत्या रचना सादर केल्या. पं. पणशीकर यांच्या गायनातील वैविध्यताही रसिकांनी अनुभवली. ’श्री अनंता मधुसुदना, पद्मनाभा नारायणा...’ ही रचना त्यांनी सादर केली, त्यांच्या गायकीनेही रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंजूषा पाटील आणि पं. रघुनंदन पणशीकर या दोघांनीही ’अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया...’ हा अभंग सादर केला आणि कार्यक्रमाचा मधुरस्वरांनी समारोप झाला. दोघांच्याही गायकीला रसिकांनी भरभरून दाद दिली. दिवाळी निमित्त सादर झालेल्या या स्वरमैफलीने रसिकांची भरभरून दाद मिळवली. कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव (तबला), प्रथमेश तारळकर (पंखवाज), अपूर्व द्रविड (साइड ऱ्हीदम) आणि जयकिशन (बासरी) यांनी साथसंगत केली. मंजूषा यांना अनुष्का आणि शची यांनी, तर पं. पणशीकर यांना ओंकार आणि गणेश आलम यांनी स्वरसाथ केली. सुनील माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. योगिता गवस यांनी सूत्रसंचालन केले. आनंद कुलकर्णी यांनी आभार मानले.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील लोकप्रिय ‘घेई छंद मकरंद...’ हे नाट्यगीत विदुषी मंजुषा पाटील यांनी प्रथमच कार्यक्रमात सादर केले आणि तेही दै. ‘पुढारी’च्या खास विनंतीवरून. मूळ नाटकामध्ये हे पद पंडितजी हे पात्र संथ लयीत आणि विलंबित मांडणीने सादर करते. आणि खाँसाहेब हे पात्र आक्रमक आणि चमकदार तानांच्या साहाय्याने हे पद रंगवते. तसेच, त्याची पुनरावृत्ती या कार्यक्रमात व्हावी, अशी विनंती दै. ‘पुढारी’तर्फे दोन्ही कलाकारांना करण्यात आली. ती त्यांनी मान्य केली आणि मंजूषा पाटील यांनी अवघ्या एका दिवसात या पदाचा सराव केला. कार्यक्रमात आधी पंडित रघुनंदन पणशीकर यांनी राग सालग वरालीत झपतालात हे पद सादर केले, त्यानंतर मंजूषा पाटील यांनी पहिल्यांदाच राग धानीत तीनतालात हे पद सादर केले. रसिकांना एक मागून एक अशा दोन भिन्न शैलीमध्ये ‘घेई छंद मकरंद...’मधील स्वरसौंदर्य लुटता आले.
हा कार्यक्रम खूप आगळावेगळा होता. अनेक वर्षांनी मी रात्री सांगीतिक कार्यक्रम सादर केला आणि त्याचे एक वेगळेपण कलाकार म्हणून मला वाटते. ही दिवाळीची स्वरसंध्या होती, हेही एक वेगळेपण होते. दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाने हे निमित्त रसिकांना उपलब्ध करून दिले आहे, याचा आनंद आहे.
मंजूषा पाटील, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका
‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची खऱ्या अर्थाने सुरुवात माझ्या गुरू गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी केली. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांची ही परंपरा आजही अविरतपणे सुरूच आहे. पण, दै. ‘पुढारी’ माध्यम समूहाने यंदा खास रसिकांसाठी दिवाळी स्वरसंध्या हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. हे खूप वेगळेपण आहे. रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा आणि मला कार्यक्रमात गायनाची संधी मिळाल्याचा आनंद आहे.
पंडित रघुनंदन पणशीकर, ख्यातनाम शास्त्रीय गायक
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. आज दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या ‘दिवाळी स्वरसंध्या’ कार्यक्रमात आम्हाला फूल ना फुलाची पाकळी योगदान देण्याची संधी दिली, त्यात आम्ही आनंदाने योगदान दिले. इथे आल्यावर आम्हाला दिसले की, इतक्या मोठ्या संख्येने रसिक येत आहेत. त्यामुळे आम्हाला अधिकच आनंद झाला. असे कार्यक्रम कायमच होत राहो. दै. ‘पुढारी’च्या सर्व वाचकांना आणि ‘पुढारी’ परिवाराला आमच्या नाईकनवरे डेव्हलपर्सकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
- रणजित नाईकनवरे, संचालक, नाईकनवरे डेव्हलपर्स
दै. ‘पुढारी’ने आयोजित केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दिवाळी काळात असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत. यामुळे पुणेकरांना दिवाळी काळात सांगीतिक मेजवानी मिळते. आमची संस्थासुद्धा अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करीत असते आणि अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देखील देते. पुढारी परिवार, उपस्थित रसिक प्रेक्षक आणि दै. ‘पुढारी’च्या वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- कल्याण जाधव, संस्थापक-अध्यक्ष, केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट
दै. ‘पुढारी’ने रघुनंदन पणशीकर, मंजूषा पाटील यांचा कार्यक्रम ‘दिवाळी स्वरसंध्या’ म्हणून आयोजित केला. सर्वत्र ‘दिवाळी पहाट’ असते. मात्र, ‘पुढारी’ने ’दिवाळी स्वरसंध्या’ आयोजित करून एक आगळावेगळा उपक्रम तयार केला आहे. या उपक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हॉल संपूर्ण भरला आहे. ‘दिवाळी स्वरसंध्या’ कार्यक्रमासाठी जमलेल्या रसिक प्रेक्षकांना, दै. ‘पुढारी’च्या वाचकांना आणि पुढारी परिवाराला दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा!
- कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष, कोहिनूर ग्रुप
दै. ’पुढारी’ने आयोजित केलेला ‘दिवाळी स्वरसंध्या’ कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. पुणेकरांची दिवाळीची सुरुवात रघुनंदन पणशीकर, मंजूषा पाटील यांच्या कार्यक्रमाने होत आहे. यामुळे त्यांची दिवाळी आणखीनच चांगली होणार आहे. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, संपूर्ण हॉल भरला आहे. ‘दिवाळी स्वरसंध्या’ कार्यक्रमासाठी जमलेल्या रसिक प्रेक्षकांना, दै. ‘पुढारी’च्या वाचकांना आणि पुढारी परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
- संजय चोरडिया, संस्थापक-अध्यक्ष,
सूर्यदत्ता एज्युकेशनल फाउंडेशन, सूर्यदत्ता एज्युकेशन ग्रुप