

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर ते जंक्शन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. हा रस्ता करण्यासाठी वालचंदनगर कंपनीने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम रखडले असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासून तातडीने रस्त्याचे काम करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा दिवाळी संपताच मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा कळंब ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांनी दिला आहे.(Latest Pune News)
वालचंदनगर-कळंब हा रस्ता वालचंदनगर कंपनीच्या खासगी मालकीच्या जागेतून जातो. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून हा रस्ता नागरी वापरासाठी खुला असल्याने या रस्त्याला कोणताही पर्यायी मार्ग अस्तित्वात आला नाही. या रस्त्यासाठी 2016-17 मध्ये केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून 18 कोटींचा निधी खर्चून वालचंदनगर ते डाळज या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्या वेळी कंपनीने या कामासाठी
ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर देखील वेळोवेळी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. सध्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून डाळज फाटा ते कळंबोली येथील निरा नदीपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. संबंधित ठेकेदाराने अवघ्या काही महिन्यांच्या कालावधीतच डाळज ते बोरी पाटीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, वालचंदनगर ते जंक्शन या टप्प्यातील काम करण्यास कंपनीने हरकत घेतल्याने रस्त्याचे काम थांबले आहे.
या रस्त्याचे काम झाल्यास कंपनीला देखील फायद्याचेच ठरणार आहे. असे असताना केवळ अडवणुकीची भूमिका घेऊन कंपनी व्यवस्थापन या रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण करीत आहे. कंपनी तालुक्यातील इतर सार्वजनिक मार्गांवरून अवजड वाहतूक करीत असताना स्वतःच्या जागेतून रस्ता करण्यास विरोध करीत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कंपनीने हा रस्ता करू दिला नाही, तर कंपनीची कोणतीही वाहतूक इतर सार्वजनिक मार्गांवरून होऊ देणार नसल्याचा इशाराही डोंबाळे यांनी दिला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील वालचंदनगर ते जंक्शन महत्त्वाचा रस्ता आहे. वालचंदनगर ही मोठी बाजारपेठ असून, परिसरात विविध शैक्षणिक सुविधा असल्याने हा रस्ता वर्दळीचा आहे. शिवाय नातेपुते, शिखर शिंगणापूर, दहीवडी, कराडला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. या रस्त्यावर वालचंदनगरजवळील गार्डन चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने प्रवाशांना ये-जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.