Pune Rain Update : पुण्यात रात्री पावसाचा धुमाकूळ; शहरात झाडपडीच्या तीन घटना

Pune Rain Update : पुण्यात रात्री पावसाचा धुमाकूळ; शहरात झाडपडीच्या तीन घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्री उशिरा अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे गणपती मंडळांचे देखावे पाहण्यास आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरातदेखील वाहतूक कोडी झाली. दरम्यान, गणपती विसर्जनावर पावसाचे सावट राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी दिवसभर कडक उन्ह होते. त्यामुळे उकाडा जाणवत होता. शहराचा कमाल तापमानाचा पारा 30 ते 31 अंश सेल्सिअसच्या आसपास होता. दरम्यान, शहराच्या काही भागांत संध्याकाळच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. मात्र, संध्याकाळी साडेसातनंतर अचानक शहरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीचालकांची तारांबळ उडाली.

शहरात झाडपडीच्या तीन घटना

शहरात रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसाने दाणादाण उडवून दिली. पावसामुळे दीपबंगला चौक, वडगाव शेरी तसेच बिबवेवाडी परिसरात झाडपडीच्या घटना घडल्या. या झाडपडीत एक जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली. शिवाजीनगर येथील ऑफिसर वसाहतीमध्ये पाणी शिरले.

  • खडकवासला- 39
  • खडकी- 37
  • कात्रज, आंबेगाव- 21
  • कोथरूड- 36
  • (रात्री 9 वाजेपर्यंत झालेला पाऊस मि. मी.मध्ये)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news