

पुणे: दारूच्या नशेत कर्तव्यावर असलेल्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. सचिन सुरेशराव जाधव आणि संजय अंकुश कराड अशी त्यांची नावे आहेत.
एकाने भरतीसारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्यप्राशन करून धिंगाणा घातला, तर दुसऱ्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडवले. या दोन्ही हवालदारांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले.
पहिली घटना 21 मार्च रोजी लोणी काळभोर येथील एमआयटी (एडीटी) विद्यापीठात घडली. पुणे शहर पोलिस भरती 2024-25 ची लेखी परीक्षा सुरू असताना हवालदार सचिन जाधव यांची नियुक्ती इमारत क्रमांक 1 मधील सेक्टर 1 च्या बंदोबस्तासाठी करण्यात आली होती. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी या बंदोबस्ताची अचानक पाहणी केली. त्यावेळी जाधव हे कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून गैरवर्तन करताना आढळले.
संशय आल्याने त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांनी मद्यार्क सेवन केल्याचे निष्पन्न झाले. एका अत्यंत महत्त्वाच्या शासकीय प्रक्रियेत अशा प्रकारे बेजबाबदार वर्तन केल्याने प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली, तर दुसरी घटना 9 मार्च रोजी घडली. ज्यामध्ये हवालदार संजय कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली. उंड्री पोलिस चौकीत ड्युटी अंमलदार म्हणून कार्यरत असताना कराड दुपारी 2 वाजता आपले कर्तव्य सोडून दुचाकीवरून काळेपडळ पोलिस ठाण्याच्या आवारात आले.
यावेळी मद्याच्या नशेत त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी पोलिस ठाण्यातील बाकड्यावर बसलेल्या एका महिला तक्रारदाराला धडक दिली. या धडकेत महिला किरकोळ जखमी झाली. त्यानंतरही शुद्धीवर नसलेल्या कराड यांनी तेथील लोकांशी हुज्जत घालत गैरवर्तन केले. वैद्यकीय अहवालात कराड यांनीही मद्यसेवन केल्याचे सिद्ध झाले. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे कृत्य ‘महाराष्ट्र नागरी सेवेचे (वर्तणूक) उल्लंघन करणारे आहे. त्यानुसार दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, तर दोन दिवसांपूर्वी वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांना निलंबन केले आहे. आयटी अभियंता तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून दहा हजार रुपये उकळल्याचा यांच्यावर आरोप आहे.