

पुणे : अवैध पद्धतीने गावठी पिस्तूल तयार करून गुंड टोळ्यांना विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमराटी गावामधील कारखान्यावर पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. 22) पहाटे छापे टाकून धाडसी कारवाई केली. परिमंडल चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेश एटीएस, जळगाव पोलिसांच्या मदतीने हे ऑपरेशन राबविण्यात आले. या वेळी पोलिसांनी तब्बल 36 जणांना पाठलाग करून पकडले.
त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग जप्त करण्यात आले तसेच पिस्तुलासाठी लागणारे पोलाद वितळविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 50 भट्ट्या पोलिसांच्या पथकाकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईसाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला.
शहरात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून टोळीयुद्धाचा भडका उडाला आहे. तसेच, किरकोळ वादातून पिस्तुलातून गोळीबार करण्याच्या घटना घडल्या होत्या. सराइतांकडून देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पोलादापासून चाकू,
सुरी करणाऱ्या कारागिरांकडून देशी बनावटीची पिस्तुले तयार करण्यात येतात. उमराटी गावातून पिस्तुलांची विक्री सराइतांना केली जाते. गेल्या महिनाभरात विमानतळ पोलिस ठाणे, काळेपडळ पोलिस ठाणे, खंडणीविरोधी पथक तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागांत कारवाई करून सराइतांकडून 21 पिस्तुले जप्त केली होती. विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात उमराटी गावातून पिस्तुले आणल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी उमराटी गावातील पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा घालण्याचे निश्चित केले, अशी माहिती सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे, संदीप भाजीभाकरे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक या वेळी उपस्थित होते.
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांना नक्षलविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा मध्य प्रदेशात पिस्तुले तयार करणाऱ्यांवर कारवाई करताना पुणे पोलिसांना झाला. मध्य प्रदेशातील कारवाईसाठी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्हे शाखेची पथके, पोलिस मुख्यालायतील गॅस गन पथक, क्विक रिस्पॉन्स टीम, बिनतारी संदेश यंत्रणा पथक (वायरलेस), मोबाईल सर्वेलन्स पथकासह 100 पोलिस कर्मचारी शनिवारी पहाटे उमराटी गावात पोहचले. तेथे विरोध होण्याची शक्यता असल्याने पथकातील सर्वांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान केले होते.
पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करताना बॉडी कॅमेऱ्यांचा वापर केला. पोलिस आल्याची चाहूल लागताच पिस्तुले तयार करणारे आरोपी पळून जातात. परंतु, पोलिसांनी अगोदरच त्यांच्या पळून जाण्याच्या वाटा अडवून ठेवल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे तेथे छापा टाकला. संशयितांना पकडून वरला पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर गावात सर्च मोहीम राबवत 50 घरांत पिस्तुले तयार करण्यासाठी लावलेल्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, नितीनकुमार नाईक, कल्याणी कासोदे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, पठाण, तांबेकर, रोकडे, रणपिसे यांच्यासह पोलिस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमरटी गावात पिस्तुले तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त केले. पोलिसांनी तेथून 36 संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.
सोमय मुंडे, पोलिस उपायुक्त, परिमंडल चार