

पुणे: बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहे. परिणामी तापमानात फारशी घट नसली तरी दिवसा उबदार तर उत्तररात्री ते पहाटेपर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
शनिवार, २२ नाेव्हेंबरला दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. २४ ला ते वायव्येकडे सरकत अग्नेय बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. पश्चिम-वायव्येकडे सरकत राहिल्याने पुढील ४८ तासांत नैऋत्य बंगालच्या उपसागरावर ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सागरावर ढग तयार झाले असून ते वेगाने राज्याकडे येत आहेत. हवेचा दाब १०१० हेक्टापास्कल तर वाऱ्याचा वेग २५ नॉटस इतका आहे. अरबी समुद्रातही वाऱ्यांचा वेग वाढला असून, तेथेही चक्रीय स्थिती तयार झाली आहे.
या हालचालींमुळे राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ढगाळ वातावरण अन् बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत फारशी जाणवणार नाही. मात्र उत्तर रात्री ते सकाळी ६ पर्यंत गारठा जाणवणार आहे. ही स्थिती २८ किंवा २९ नोव्हेंबरपर्यंत राहील, असा अंदाज आहे.
राज्याचे शनिवारचे तापमान...
बीड १०.१, पुणे ११, अहिल्यानगर १०.३, जळगाव ११.३, मालेगाव ११.६, सातारा १३.४, छ. संभाजीनगर ११.९, परभणी १२.९, अकोला १३.४, अमरावती १३.३, बुलडाणा १३.७, गोंदिया ११.४, नागपूर १२.९, वाशीम ११.४, यवतमाळ १२.४