

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना अर्थात स्पुक्टोने सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनावर सहा दिवसांनंतरही तोडगा निघाला नाही, त्यामुळे प्राध्यापकांचे आंदोलन सुरूच आहे.
विद्यापीठ प्रशासनाबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. परिणामी स्पुक्टो संघटनेने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने येत्या सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींना बोलावले आहे.
विद्यापीठातील विविध विभागांमध्ये अनेक नवीन विषय सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी विद्यापीठाने विद्यापीठ फंडातून नियमित वेतनश्रेणीवर प्राध्यापकांच्या नेमणुका केल्या आहेत. या प्राध्यापकांना सुरुवातीला पाच वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर वीस वर्षे अथवा सेवानिवृत्तीपर्यंत सेवा सातत्य देण्याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून विविध अडथळे निर्माण केले जात आहेत.
यामुळे प्राध्यापकांमध्ये असंतोष आहे. तसेच नियुक्तीपासून प्राध्यापकांना लागू असलेला अंशदायी भविष्य निर्वाह निधीसंदर्भात विद्यापीठाने नुकतेच एक परिपत्रक काढून तुटपुंजी रक्कम भविष्य निवाह निधी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला सुध्दा संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन या दोन प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे.
गेल्या सहा दिवसांत आंदोलनस्थळी विविध संघटनांनी भेट देऊन आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीसुध्दा आंदोलक प्राध्यापकांशी संवाद साधून यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. परंतु विद्यापीठाकडे प्राध्यापकांची संख्या कमी असताना, आहे त्या प्राध्यापकांना एक ते तीन महिन्याची कंत्राटी नियुक्ती दिली जात आहे, ही बाब अन्यायकारक असल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय स्पुक्टो संघटनेने घेतला आहे. या आंदोलनावर येत्या सोमवारी तरी तोडगा निघावा, अशी मागणी संबंधित प्राध्यापकांनी केली आहे.