

पुणे: एरंडवणे येथील अनंत रेस्टो बारमध्ये दरोडा टाकणाऱ्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. धक्का लागल्याच्या कारणातून झालेल्या भांडणाच्या तक्रारीत नावे दिल्याच्या रागातून आरोपींनी त्यांच्या मित्रांना सांगून दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अजिंक्य रवींद्र ओवाळ (वय २१, रा. नर्हे), प्रचित लक्ष्मण काकडे (वय २४, रा़. एरंडवणा गावठाण), यशराज शेडगे ऊर्फ लड्ड्या (रा. पर्वती), प्रणव ढोंबळे (रा. ममता स्वीट, कर्वेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मीकांत गुंजकर यांनी फिर्याद दिली होती.
एरंडवणा येथील अनंत रेस्टो बारमध्ये १७ नोव्हेंबरला पहाटे १ वाजता धक्का लागल्याने चौघांनी ओंकार कदम व त्याच्या मित्राला मारहाण केली होती. त्यात प्रचित काकडे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहाटे दीड वाजता अनंत रेस्टो बार बंद असताना त्याचे शटर वर करून पाच जण आत शिरले. त्यांनी बार व्यवस्थापकाला धाक दाखवून गल्ल्यातील २० हजार रुपये दरोडा टाकून चोरून नेले होते. या दोन्ही गुन्ह्याचा तपास डेक्कन पोलिस करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेतले.
प्रचित काकडेची चौकशी केल्यावर मारहाणीच्या गुन्ह्यात आमची नावे आल्याने चिडून मित्रांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेत गुन्हा घडला तेथे नेऊन त्यांची धिंड काढण्यात आली. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनात डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलिस निरीक्षक प्रसाद राऊत, पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, अजय भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.