

पुणे: नात्यातील तरुणीशी बोलल्याने एका तरुणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. त्यानंतर टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. दोघांवर कोयत्याने वार करून टोळके पसार झाले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नयन राम राडे (वय २५, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. टोळक्याने केलेल्या मारहाणीत नयनचा मित्रही जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून, त्यातील रिहान जमाल मोमीन (वय 18,रा. अप्पर इंदिरानगर बिबवेवाडी), ओंकार संजय भिसे (वय 22, रा.बालाजीनगर), दीपक विजयकुमार देवंगरे (वय 22,रा. सुखसागर,कात्रज), श्रीकांत शंकर धनगर ( वय 20, रा.गंजपेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तर दोघा विधीसंघर्षीत मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या एका आरोपीच्या बहिणीसोबत नयन बोलत होता.
बहिणीसोबत बोलत असल्याने आरोपी त्याच्यावर चिडले होते. या कारणावरून २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नयन आणि त्याच्या मित्राला कोंढव्यातील साईनगर परिसरात आरोपींनी गाठले.
आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. दोघांना मारहाण करून दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक पठाण तपास करत आहेत.