

Pune Metro Project Central Cabinet Approval
पुणे : वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे रस्ते, वाहतूक कोंडी अशा संकटात सापडलेल्या पुणेकरांना आता दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला बुधवारी मंजुरी दिली. खराडी-खडकवासला (लाइन ४) आणि नळ स्टॉप- वारजे- माणिक बाग (लाइन ४अ) या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे मेट्रो प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत लाइन ४ (खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवसला) आणि लाइन ४ए (नळस्टॉप–वारजे–मानिक बाग) ला मंजुरी देण्यात आली.
टप्पा-२ मधील यापूर्वी मंजूर झालेल्या लाइन २ए (वनाझ–चांदणी चौक) आणि लाइन २बी (रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी) नंतर हा दुसरा मोठा प्रकल्प आहे.
31 किमी लांब, 28 उन्नत स्थानक; असा असेल मार्ग?
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या प्रकल्पामुळे पुण्याचा पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भाग एकमेकांशी जोडला जाणार आहे. या प्रकल्पाची लांबी एकूण 31.63 किमी असेल. या मार्गावर २८ उन्नत स्थानके असतील.
प्रकल्पासाठी खर्च किती होणार?
हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार असून त्याचा अंदाजित खर्च ९,८५७.८५ कोटी रुपये इतका आहे.
हा खर्च भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/बहुपक्षीय निधी संस्थांच्या मदतीने केला जाईल.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार
हडपसर रेल्वे स्थानकावर इंटरचेंज सुविधा उपलब्ध होईल आणि भविष्यात लोणी काळभोर व सासवड रोडकडे जाणाऱ्या कॉरिडॉरशीही जोडल्या जातील, ज्यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बस यांच्यातील मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.
खराडी आयटी पार्कपासून खडकवसल्याच्या निसर्गरम्य पट्ट्यापर्यंत, हडपसरच्या औद्योगिक हबपासून वारजेतील निवासी संकुलांपर्यंत, लाइन ४ आणि ४ए विविध भागांना एकत्र जोडतील.
सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, सिंहगड रोड, कारवे रोड आणि मुंबई–बेंगळुरू महामार्ग या पुण्यातील सर्वात व्यग्र मार्गांवरून जाणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, सुरक्षितता वाढेल आणि शाश्वत गतिशीलता प्रोत्साहन मिळेल.
अंदाजानुसार, २०२८ मध्ये लाइन ४ आणि ४ए वर एकत्रित रोज ४.०९ लाख प्रवासी प्रवास होतील.
पुण्यातील मेट्रो प्रकल्प कोणामार्फत राबवला जाईल?
हा प्रकल्प महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र मेट्रो) मार्फत राबवला जाईल, जे सर्व सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिस्टीमचे काम करेल. टोपोग्राफिकल सर्व्हे आणि तपशीलवार डिझाइन सल्लागार यांसारखी प्री-कॉन्स्ट्रक्शन कामे आधीपासूनच सुरू आहेत.या नवीन मंजुरीमुळे पुणे मेट्रोचे जाळे १०० किलोमीटरचा टप्पा ओलांडणार आहे.