Pune News : किल्ल्यांनी सजली बाजारपेठ : अवतरला शिवकाळ

Pune News : किल्ल्यांनी सजली बाजारपेठ : अवतरला शिवकाळ
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रायगडापासून ते तोरणापर्यंत… सिंहगडापासून ते प्रतापगडापर्यंत…अशा विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून आणि किल्ल्यांवर ठेवायची चित्रे पाहून लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलले…कारण त्यांना खर्‍या अर्थाने दिवाळीचा आनंद देणार्‍या अन् छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या किल्ल्यांच्या प्रतिकृती कुंभारवाड्यासह ठिकठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि या किल्ल्यांच्या प्रतिकृती खरेदी करण्यासाठी लहानगे आई-वडिलांसह गर्दी करत आहेत. कुंभारवाड्यात वॉटरप्रुफ किल्ले विक्रीसाठी उपलब्ध असून, किल्ल्यांवर ठेवायची मावळ्यांसह इतर चित्रेही लक्ष वेधून घेत आहेत.

दिवाळी जवळ आली की, माती आणण्यापासून किल्ल्यासाठी जागा निवडणे, त्याचा आकार ठरविणे, वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती गोळा करून त्यांचा इतिहास जाणून घेणे व त्यानंतर योग्य किल्ला तयार करणे, असे बच्चेकंपनीचे नियोजन सुरू होत होते. मात्र, वाढत्या शहरीकरणानंतर फ्लॅटसंस्कृती तसेच किल्ल्यांसाठी लागणारी माती, दगड, विटा आदी गोष्टी सहज उपलब्ध होत नाही. म्हणूनच, बाजारात उपलब्ध असलेल्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतींची खरेदी करण्याकडे पालकांचा कल वाढत आहे.

यंदा किल्ले खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. तोरणा, सिंहगड, राजगड असो वा काल्पनिक किल्ले… असे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) किल्ले खरेदी केले जात आहेत. दिवाळीनिमित्त लहान मुलांसह विविध मंडळांकडून हे किल्ले खरेदी केले जात आहेत. किल्ल्यांच्या प्रतिकृतीसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीही उपलब्ध आहेत.

मावळे, तोफा, हत्ती, घोडा, उंट, पोलिस, सैनिक अशी विविध चित्रेही खरेदीसाठी उपलब्ध असून, ही चित्रे 20 रुपयांच्या पुढे विकली जात आहेत. कुंभारवाड्यातील व्यावसायिक बाळू शेलार म्हणाले, 'आम्ही गणेशोत्सवादरम्यान किल्ले आणि मूर्ती बनवायला सुरुवात केली. सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृती हे पीओपीच्या आहेत. रायगड, राजगड, प्रतापगड याबरोबरच काही काल्पनिक किल्लेही तयार केले आहेत. 8 इंचापासून ते 3 फुटापर्यंतचे किल्ले उपलब्ध आहेत.

लहान मुले तयार करताहेत मातीचे किल्ले

दिवाळी म्हटल्यावर आपल्या मित्रांसोबत मातीचे किल्ले तयार करण्याची रीत ठरलेलीच आहे. ती रीत संस्कृतीत कायम असून, नवी पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आदी ठिकाणी लहान मुले एकत्र येऊन मातीचे किल्ले तयार करताना दिसत आहेत. कोणी काल्पनिक किल्ला साकारत आहे, तर कोणी सिंहगडाची प्रतिकृती हुबेहूब तयार करत आहे. मातीचे किल्ले तयार करण्यात मुले मग्न झालेली दिसत असून, त्यांच्यात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. छोट्याशा जागेत दगड, विटा, माती आणून स्वत:च्या हाताने ते किल्ले तयार करत आहेत.

यंदा विक्रीसाठी काल्पनिक किल्ले उपलब्ध असून, किल्ले खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे वॉटरप्रुफ किल्लेही खरेदीसाठी उपलब्ध असून, यंदा किल्ल्यांच्या प्रतिकृतीची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे.

जयेश दरेकर, व्यावसायिक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news