कोल्‍हापूर : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे पाणी; पेठवडगाव अन् परिसरात पावसाचे तांडव | पुढारी

कोल्‍हापूर : दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे पाणी; पेठवडगाव अन् परिसरात पावसाचे तांडव

किणी ; पुढारी वृत्तसेवा पेठवडगाव शहर व परिसराला आज (बुधवार) पहाटेपासून परतीच्या पावसाने झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने दिवाळीच्या उत्साहावर पाणी फिरवले.

आज पहाटेपासूनच रिपरिप पावसाला सुरुवात झाली. सकाळी सातनंतर मात्र विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह धो-धो पाऊस कोसळू लागला. वडगाव शहरासह ग्रामीण भागातही दिवाळी बाजार साहित्यांनी भरला आहे. मातीचे दिवे, पणत्या, रांगोळी, सुवासिक द्रव्ये, फटाके आणि कपड्यांच्या दुकाने खरेदीसाठी सज्‍ज होती. आधीच बाजारात मंदी आणि त्यात या पावसामुळे छोट्या व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली.

दिवाळी सणासाठी रस्त्यावर दुकाने थाटलेल्या लहान व्यावसायिक व फेरीवाल्यांची या पावसामुळे तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले. काही दुकानांत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांच्या साहित्‍याचे नुकसान झाले. सकाळच्या सत्रात पावसामुळे ग्राहकही बाजारपेठेत फिरकले नाहीत, तर काही व्यापाऱ्यांनी दुकानेही उघडली नाहीत.

पेठवडगावसह किणी, वाठार घुणकी, भादोले परिसरातही धो- धो बरसणाऱ्या पावसाने सर्वच कामांचा खोळंबा केला. महामार्गावरील वाहनेही सकाळपासून मंदावली होती. सखल भागात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. पावसाळ्यात ऐनवेळी पावसाने दांडी मारल्याने शेतीसाठी पावसाची आवश्यकता होती. या पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला आहे. या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना चांगले वातावरण तयार झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button