पुणे/हडपसर : पुढारी वृत्तसेवा : भैरोबानाला ते शेवाळवाडी यादरम्यान सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिकेने मंगळवारी कारवाई केल्याने या परिसराने मोकळा श्वास घेतला. या कारवाईत अनधिकृत शेड, पानटपर्या, ओटे, फलक आणि दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे हटवून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहतुकीचे 15 रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आदर्शवत असे रस्ते तयार करण्याचे प्रशासनाने ध्येय ठेवले आहे.
त्यानुसार रस्ते अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण, बांधकाम, विद्युत, पथ आदी विभागांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेसातपासूनच सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाईस सुरुवात केली.
या कारवाईत अनधिकृत शेड, पानटपर्या, ओटे, दुकानांची फ्रंट मार्जिनमधील बांधकामे व फलक काढले. ही कारवाई चार जेसीबी, चार गॅसकटर, दहा ट्रक आणि साठ बिगारी यांच्या साहाय्याने पोलिस बंदोबस्तात करण्यात आली. अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप, उपायुक्त प्रसाद काटकर, पथ विभागाचे प्रमुख अनिरुध्द पावस्कर, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, अतिक्रमण अधिकारी धम्मानंद गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
शहारातील मुख्य 15 रस्त्यांची निवड आदर्श रस्ते म्हणून करण्यात आली आहे. त्या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्याप्रमाणे नगर रस्त्यावरील रस्त्याचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले. महापालिकेने रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे.
– विकास ढाकणे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका
हेही वाचा