Pune News : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक!
पुणे; टीम पुढारी : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास उपनगरांच्या विविध भागांतून दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हडपसर, वारजे, खडकी, खडकवासला, खानापूर, पौड रोड येथे करण्यात आलेल्या आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'एक मराठा, लाख मराठा', 'एकच मिशन, मराठा आरक्षण', यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
हडपसर येथे तीन हजार नागरिकांचा मोर्चा
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने हडपसर येथे काढण्यात आलेल्या मोर्चात सुमारे 3 हजार नागरिक सहभागी झाले होते. या वेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी आंदोलकांनी हात वर करून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवला. ससाणेनगर ते हडपसर गाडीतळमार्गे सोलापूर रोड, रवीदर्शनपासून गाडीतळ पीएमपी बस थांब्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, शालेय विद्यार्थी व लहान मुले मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
संदीप लहाने पाटील म्हणाले, 'जरांगे पाटील यांची मागणी ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. बेमुदत उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका झाल्यास त्यास राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदार जबाबदार असतील. सरकारने मराठ्यांचा अंत न पाहता तातडीने त्यांना आरक्षण द्यावे.' राजकीय कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींना या आंदोलनाचे नेतृत्व न देता त्यांना या मोर्चामध्ये मागे उभे राहण्याचे नियोजन करण्यात आले होते.
सामान्य कार्यकर्त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केल्याचे चित्र या वेळी दिसून आले. दरम्यान, लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेषभूषा करून घोषणा दिल्या. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन लहान मुलींच्या हस्ते हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांना देण्यात आले. ते जिल्हाधिकार्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे शेळके यांनी या वेळी सांगितले.
खडकीत लाक्षणिक उपोषण
मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरंगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खडकी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्यात आले. खडकी येथील व्हीलक्स थिएटरच्या आवारात हे उपोषण करण्यात आले. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, उद्योजक विवेक शिंदे, श्वेता जाधव, रोहिणी वांजळे, राजा सोनवणे, रवी गायकवाड, भरत जाधव आदी या उपोषणात सहभागी झाले होते.
हेही वाचा

