Nashik Weather : नाशिककरांना पहाटे जाणवतोय गारठा  | पुढारी

Nashik Weather : नाशिककरांना पहाटे जाणवतोय गारठा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नवरात्राेत्सवानंतर नाशिककरांना गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घट होत असून, किमान तापमानाचा पारा १४.८ अंशांपर्यंत खाली आहे. रात्री तसेच पहाटेच्या वेळी हवेत गारठा जाणवत आहे. त्यामुळे शहरवासीय आता उबदार कपडे परिधान करत आहेत. (Nashik Weather)

गेल्या महिनाभरापासून आॅक्टाेबर हीटच्या झळांमुळे नाशिककर हैराण झाले. कमाल तापमानाचा पारा थेट ३५ अंशांपलीकडे जाऊन पाेहोचल्याने सामान्यांना घामाच्या धारा लागल्या. मात्र, नवरात्री उत्सव संपताच तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने घसरण हाेऊ लागली आहे. मागील पाच दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पहाटे व रात्रीच्या सुमारास हवेमध्ये गारवा निर्माण होत आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुक्यात शहर हरवून जात आहे. त्यामुळे नागरिकांना आता थंडीची चाहूल लागली आहे. रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. (Nashik Weather)

थंडीचा कडाका वाढत असताना पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. युवकांसह ज्येष्ठांची पावले शहरातील मैदाने व जॉगिंग ट्रॅककडे वळत आहेत. दरम्यान, चालू वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अपेक्षित मान्सून झाला नाही. जून ते आॅगस्ट या कालावधीत त्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सप्टेंबरमध्ये अखेरच्या टप्प्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्याचा परिणाम म्हणजे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार पुढील महिन्यात पाऱ्यात अधिक घसरण अपेक्षित आहे.

शहरातील तापमान (किमान)

तारीख             सेल्सिअस

25 आॅक्टोबर 17.6

26 आॅक्टोबर 15.3

27 आॅक्टोबर 15.0

28 आॅक्टोबर 14.5

29 आॅक्टोबर 14.8

हेही वाचा :

Back to top button