कोल्हापूर : गोडवा वाढतोय; क्विंटल गूळ 5 हजारांपर्यंत | पुढारी

कोल्हापूर : गोडवा वाढतोय; क्विंटल गूळ 5 हजारांपर्यंत

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाने दरात आघाडी घेतली आहे. सध्या गुळाला 3,800 ते 5,100 रुपये क्विंटलला भाव मिळत आहे. यामुळे गूळ उत्पादन वाढविण्याच्या द़ृष्टीने गुर्‍हाळमालकांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बाजार समितीने गुर्‍हाळे सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. हंगामात जास्तीत जास्त गूळ रव्यांची आवक होईल, असे नियोजन आहे. गेल्या आठ दिवसांत 1 लाख 20 हजार गूळ रव्यांची विक्री झाली.

हंगाम सुरू होऊन आठ दिवस झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 50 पेक्षा अधिक गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. खरिपात कमी झालेला पाऊस, परतीच्या पावसाने फिरवलेली पाठ, उसाच्या वाढीमध्ये होत असलेली घट, यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कारखाने सुरू होण्यास विलंब लागत आहे, तोपर्यंत उसाचे रान मोकळे करण्यासाठी अनेक शेतकरी ऊस गूळ उत्पादनासाठी वापरत आहेत.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज गूळ रव्यांची मोठी आवक होत आहे. सध्या करवीर तालुक्यातच फक्त 50 गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. याच तालुक्यात आणखी 50 गुर्‍हाळे सुरू होतील, असे चित्र आहे. शिवाय, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांतून गुर्‍हाळे सुरू होणार आहेत. यामुळे यावर्षी 300 ते 400 गुर्‍हाळे सुरू होतील, असा अंदाज आहे.

बाजार समितीचे जे संचालक आहेत, त्यापैकी गूळ उत्पादन घेणार्‍या संचालकांनी आपला गूळ मार्केट यार्डात आणावा, असे चेअरमन यांनी बैठकीत सांगितले आहे; पण काही संचालकांचा त्याला अजून प्रतिसाद नसल्याची मार्केट यार्डात जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या चार दिवसांत गुळाची झालेली आवक, मिळालेला दर असा

बुधवारी 21 हजार गूळ रव्यांची, तर 5 हजार बॉक्सची आवक झाली. भाव 4 हजार ते 5,100 रुपये झाला. त्या दिवशी 80 टक्के गुळाची विक्री झाली. शुक्रवारी 28 हजार रवे व 7 हजार बॉक्सची आवक झाली, त्याचा दर सरासरी 4,900 रुपये झाला. शनिवारी 30 हजार रवे आणि 9 हजार बॉक्सची आवक झाली, दर 5 हजार रुपये झाला. या प्रमाणात दररोज गुळाची आवक होत आहे. अडत दुकानात गूळ शिल्लक राहत नाही, अशी परिस्थिती आहे.

Back to top button