

सुनील माळी
एखादा पक्ष जन्माला येतो. मेट्रोसिटी असलेल्या पुणे महापालिकेत सलग तीन टर्म सत्ता उपभोगतो. अगदी झंझावाती मोदी लाटेतही आपली मूळ घट्ट धरून ठेवतो, अशा पक्षाला राजकीयदृष्ट्या ‘यशस्वी पक्ष’ म्हटलं, तर ते म्हणणं एकांगी वा पक्षपाती ठरेल काय? नाही ना? वर्धिष्णु म्हणजेच सातत्यानं वाढ होणारा अन् पीछेहाटीतही फारसा न डगमगणारा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस... असं असलं तरी गत निवडणुकीपासून भाजपला आलेली झळाळी अन् राष्ट्रवादी दुभंगली जाणं, यामुळं वर्धिष्णु प्रतिमा जपण्याचं आव्हान या पक्षापुढं निर्माण झालं आहे. अर्थात, राष्ट्रवादीच्या मनोमिलना बाबतच्या बातम्या खऱ्या ठरल्या, तर ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी’ हा सामना रंगतदार होईल.
काँग्रेस दुभंगली अन् राष्ट्रवादीचा जन्म झाला. पक्षफुटीतून उदयास आलेल्या या राष्ट्रवादीचीच आता दोन शकलं झाली आहेत अन् दोन्ही पक्ष महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. सन 1999 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून फुटून निघाले अन् काँग्रेसच्या वैभवाला हादरे बसायला सुरुवात झाली. काँग्रेसशी राष्ट्रवादीचा पुण्यातला पहिला मुकाबला झाला तो 2002 च्या निवडणुकीत. त्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीनं 22 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या जागा कमी व्हायला झालेली ती सुरुवात होती. काँग्रेसनं 1997 मध्ये मिळवलेल्या 67 जागांमध्ये सहा जागांची घट होऊन त्या पक्षाला 61 जागा मिळाल्या. एकूण जागा 146 असल्यानं सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं राष्ट्रवादीची मदत घेतली. त्याची परिणिती म्हणजे पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीला पुण्याच्या सत्तेची चव चाखायला मिळाली.
मिळालेली सत्ता आणि नंतरच्या काळात झपाट्यानं केलेली पक्षबांधणी, यामुळे राष्ट्रवादीनं गत निवडणुकीच्या तुलनेत 2007 च्या निवडणुकीत महापालिकेतली आपली ताकद जवळपास दुपटीनं वाढवत 41 पर्यंत नेली. एवढंच नव्हे, तर 1992 पासून सत्तेला चिकटून बसलेल्या काँग््रेासला आणि सुरेश कलमाडी यांच्या एकमुखी नेतृत्वाला काहीही झालं तरी सत्तेवरून खाली खेचायचंच, या निश्चयानं राष्ट्रवादीनं काँग्रेसची साथ सोडली आणि भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या साथीनं सत्ता हस्तगत केली. त्यामुळेच राज्यभर गाजलेला ‘पुणे पॅटर्न’ साकार झाला. अर्थात, हा पॅटर्न फार काळ टिकला नाही. दोन-अडीच वर्षांतच राष्ट्रवादीच्या अजितदादांनी काँग्रेसचे एकेकाळचे ‘सबसे बडा खिलाडी’ असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपला रुसवा सोडला. पुन्हा एकदा दोन्ही पक्षांची आघाडी सत्तेवर आली. पण, 2002 मध्ये जी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होती ती 2009 मध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी झाली. हा फार मोठा बदल होता. कारण, सत्तेचे वाटप ठरवणारा तो मोठा भाऊ होता. राष्ट्रवादी पक्ष आपले हात-पाय पसरतच होता. मूळच्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतल्या आणि आता उपनगरांत राहणाऱ्या मतदारांचा कल साहजिकच राष्ट्रवादीकडे होताच; पण शहरातही मोजक्याच का होईना; पण जागांवर राष्ट्रवादी आपले अस्तित्व दाखवू लागला होता. त्याचाच परिणाम 2012 च्या निवडणुकीत त्या पक्षानं आत्तापर्यंतच्या निवडणुकांमधील सर्वाधिक म्हणजे 51 जागा खेचल्या. काँग्रेस 36 वरून 28 पर्यंत उतरल्यानं तिची अवस्था केविलवाण्या अवस्थेकडून अधिक केविलवाण्या अवस्थेकडे गेली. तरीही राष्ट्रवादीनं काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादीच्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजेच 2002-2012 पर्यंत पक्षाची कमान चढतीच का राहिली? त्यामागील कारणांचा बारकाईनं शोध घेतला तर बहुजन मराठा समाज हा या पक्षाचा पाया राहिल्याचं दिसून येतं. त्यात शरद पवार यांच्या सर्वधर्मसमभावाच्या प्रतिमेनं मुस्लिमांपासून अन्य समाजांचाही पक्षाला पाठिंबा मिळत गेला. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत या पक्षाच्या नगरसेवकांपैकी बहुसंख्य जण पुण्याच्या उपनगरांतून निवडून आले. त्यात खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांमधील नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. हडपसर मतदारसंघातून 14, खडकवासला मतदारसंघातून 13 तर वडगाव शेरीतून 6 म्हणजे 41 नगरसेवकांपैकी 33 जण या तीन मतदारसंघांतून, तर कोथरूड मतदारसंघातून 3, पर्वती आणि कसब्यातून प्रत्येकी 2 आणि कॅन्टोन्मेंटमधून 1 नगरसेवक निवडून आला होता. महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या करिश्म्याने भाजप प्रथमच स्वबळावर आला. भाजपच्या या झंझावातात काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांची पुरती वाताहत झाली. मात्र, थोडीशी पडझड वगळता राष्ट्रवादीचा किल्ला तसा मजबूतच राहिला. काँग्रेस 28 नगरसेवकांवरून 10, तर मनसे 28 वरून अवघ्या 2 जागांपर्यंत घसरत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र 51 वरून 41 जागांपर्यंतच कमी झाला. त्यांची ताकद फारशी कमी झाली नाही, याचे कारण त्या पक्षाचा मजबूत पाया.
...अशी भरभक्कम स्थिती असतानाच कुठेतरी माशी शिंकली अन् राष्ट्रवादीमध्ये भूकंप झाला. पक्षाची शरद पवार-अजित पवार राष्ट्रवादी अशी दोन शकलं झाली. पुण्यातील राष्ट्रवादीची बरीचशी ताकद अजितदादांकडं गेल्याचं जाणवत आहे. बरखास्त झालेल्या महापालिकेच्या सभागृहातील राष्ट्रवादीच्या 41 नगरसेवकांपैकी 30 ते 35 नगरसेवक अजितदादांकडे तर अवघे 5 ते 7 नगरसेवक शरद पवार यांच्याकडे आहेत. मात्र, त्यामुळे शरद पवारांना कमी लेखण्याचं कारण नाही. कुस्तीतील डाव कितीही अवघड परिस्थितीतला असला, तरी भन्नाट खेळी करून प्रतिस्पर्ध्याला अगदी चितपट नाही, तरी संपूर्ण यश मिळू न देण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. ते यात काय खेळी करतात? त्यावर बरेचसे चित्र अवलंबून असेल. त्याचबरोबर आता अजितदादांच्याही नेतृत्वाची, राजकीय कौशल्य अन् दूरदृष्टीची कसोटी लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करून उपमुख्यमंत्रिपद भूषवत असले, तरी पुणे महापालिकेत भाजपशी युती करणं त्यांना परवडणारं नाही. त्यांनाच कशाला? भाजपलाही असा प्रबळ सहकारी नको आहे. याचं कारण भाजपची पुण्यातील भरभक्कम स्थिती. राष्ट्रवादीशी युती करायची, तर त्या पक्षाला किमान चाळीस ते पन्नास जागा द्याव्या लागतील आणि तितक्या जागा देण्याची भाजपची तयारी नाही. कारण, गेल्या वेळी त्यांच्याच 98 जागा निवडून आल्यानं आणि इतर जागांवर अनेक ताकदवान इच्छुक निर्माण झाल्यानं पन्नास जागा देण्याचा विचारसुद्धा ते करू शकणार नाहीत. राष्ट्रवादीची स्थिती भाजपइतकी मजबूत नसली, तरी शहरातली दुसऱ्या क्रमांकाची मजबूत स्थिती तरी त्यांची आहे. त्यामुळं सर्व प्रभागांतील त्या पक्षातल्या इच्छुकांचं समाधान करण्यासाठी स्वबळावर लढण्याशिवाय त्यांच्यापुढे तरी दुसरा पर्याय नाही. त्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेच्या येत्या निवडणुकीत एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. भाजपबाबतची शरद पवार यांची भूमिका सौम्य झाली आहे का, ती तशी झाली असेल तर त्यामागं नेमका कोणता विचार असेल आदी प्रश्नांची उत्तरं कसलेल्या विश्लेषकालाही देता येणार नाहीत. दादा-पवार एकत्र येणं हे भाजपला कितपत रुचेल, त्यांनी आता एकत्र येणं, हा भाजपच्याच डावपेचांचा भाग आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. ...खरी उत्सुकता आहे ती गेल्या निवडणुकीचा निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेसची यशाची चढती कमान हळूहळू खाली यायला सुरुवात झाली, असं मानायचं का हा पक्ष पुन्हा उसळी घेणार? याच्या उत्तराची.